संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाला थिएटरमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या चित्रपटावरून बरेच वादसुद्धा निर्माण झाले होते. त्यातील सीन्स, डायलॉग यांवरून अनेकांनी टीका केली होती. तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर ‘ॲनिमल’ने तब्बल 900 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र ‘ॲनिमल’ला ओटीटीवर एका कमी बजेटच्या चित्रपटाने मागे टाकलं आहे. थिएटरमध्ये 20 कोटी रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या या छोट्या बजेटच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर ‘ॲनिमल’पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले होते. जगभरात ‘ॲनिमल’ची कमाई 900 कोटी रुपयांच्या घरात झाली. तर दुसरीकडे आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट मार्च महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली होती. आता महिनाभरापूर्वी नेटफ्लिक्सवर आलेल्या या चित्रपटाने 13.8 दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. तर ‘ॲनिमल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर जानेवारी महिन्यात आला होता. त्यानंतर पहिल्या तीन आठवड्यांत या चित्रपटाला 13.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि चौथ्या आठवड्यात तो टॉप 10 च्या यादीतून बाहेर पडला. तर दुसरीकडे ‘लापता लेडीज’ हा टॉप 10 च्या यादीत ‘ॲनिमल’पेक्षा एक आठवडा अधिक टिकून राहिला आणि टॉप 5 मध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं.
किरण राव आणि संदीप रेड्डी वांगा यांनी विविध मुलाखतींमध्ये एकमेकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. ‘ॲनिमल’ हा चित्रपट स्त्रीविरोधी असल्याचं किरणने म्हटलं होतं. त्याला संदीपनेही नाव न घेता तिच्यावर टीका केली होती. मात्र आता ओटीटीवर किरण रावच्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचं सोशल मीडियावरही खूप कौतुक होत आहे.
17 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवलेला ‘फायटर’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपटालाही चांगले व्ह्यूज मिळत आहेत. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाला आतापर्यंत 13 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.