मुंबई : 24 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. आमिर सध्या त्याच्या पूर्व पत्नीसोबत मिळून तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय. या चित्रपटानिमित्त दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये आमिर आणि किरण त्यांच्या घटस्फोटाबद्दल आणि मतभेदांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. आता नुकत्याच एका कार्यक्रमात किरणने आमिरला घटस्फोट दिल्यानंतर त्यातील कोणते गुण आवडत नाहीत, याबद्दल सांगितलं आहे. त्याचप्रमाणे ती त्याच्या चांगल्या गुणांबद्दलही व्यक्त झाली.
या कार्यक्रमात आमिर म्हणाला, “नुकताच माझा आणि किरणचा घटस्फोट झाला. एके संध्याकाळी आम्ही सहज बसून गप्पा मारत होतो. तेव्हा मी किरणला विचारलं की एक पती म्हणून माझ्यात कोणत्या गुणांची कमतरता होती? त्यावर किरण म्हणाली, लिहून घे.. तू खूप बडबड करतोस. तू दुसऱ्यांना बोलू देत नाहीस. एकाच मुद्द्यावर अडून बसतोस. तर असे 15 ते 20 मुद्दे मी लिहून काढले आहेत.”
यावेळी किरणने आमिरचे चांगले गुण कोणते, त्याबद्दलही सांगितलं. “आमिर खूप मोकळ्या मनाचा आहे. जर तुम्ही एखादी गोष्टी त्याला समजावून सांगितलं आणि त्यात खरंच काही महत्त्व असेल तर तो कधीच नकार देत नाही. तो लगेच त्या गोष्टीला स्वीकारतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. तो सर्वांची मतं खुल्या मनाने ऐकून घेतो”, असं ती म्हणाली.
आमिर आणि किरण यांनी एकमेकांना घटस्फोट दिला असला तरी त्यांच्यात अजूनही चांगली मैत्री आहे. घटस्फोटानंतर आमिरसोबत असलेल्या नात्याविषयी किरण एका मुलाखतीत म्हणाली, “तुम्ही इतर एक्स कपल्सना पाहिलात तर तेसुद्धा तुम्हाला एकमेकांशी चांगलं वागताना दिसतील. मात्र हे प्रत्येक नात्यात होत नाही. आमिर आणि मी एकत्र काम करतो, एकाच इमारतीत राहतो आणि त्याचं कुटुंब हे त्याच्यापेक्षा जास्त माझं आहे. म्हणूनच आमचं नातं असामान्य आहे असं मला वाटतं.”
आमिर आणि किरणने 2005 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र घटस्फोटानंतरही किरण आणि आमिर यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. किरणच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचं प्रमोशन दोघं मिळून करत आहेत.