मुंबई : अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या झटक्यानंतर बॉक्स ऑफिसवर आपला तोल सांभाळला. प्रदर्शनाच्या दिवशी या चित्रपटाने केवळ 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ही कमाई फारच कमी होती. गेल्या दहा वर्षांत जेव्हा जेव्हा सलमानचे चित्रपट ईदला प्रदर्शित झाले, तेव्हा त्यांची कमाई 21 कोटी रुपयांपेक्षा कमी झाली नव्हती. त्यामुळे पहिल्या वीकेंडकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पहिल्या वीकेंडला सलमानच्या चित्रपटाने जबरदस्त कमाई करत 68 कोटी रुपयांचा आकडा गाठला. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत तब्बल 60 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली होती. मात्र सोमवारी पुन्हा कमाईत घट झाली.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने सोमवारी जवळपास 10 ते 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 74 कोटींचा आकडा गाठला आहे. सलमान खानचा चित्रपट पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा आकडा पार करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शुक्रवार – 15 कोटी रुपये
शनिवार – 25 कोटी रुपये
रविवार – 26.25 कोटी रुपये
सोमवार- अंदाजे 10 ते 11 कोटी रुपये
एकूण – 74.25 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, ज्या चित्रपटांची कथा जबरदस्त असते आणि संपूर्ण चित्रपट एक एंटरटेन्मेंट पॅकेज असतो तो चित्रपट दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई करतो. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट सलमानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक नाही. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा गाठू शकेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुदैवाने 2 जून रोजी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाआधी कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित होत नाहीये. त्यामुळे सलमानच्या चित्रपटाकडे कमाईसाठी पुरेसा वेळसुद्धा आहे.
या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. सलमानचा हा चित्रपट दोन कारणांसाठी खास मानला जातोय. पहिलं म्हणजे जवळपास तीन वर्षांनंतर सलमानचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.