निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा 2019 मधील क्रिकेटर्सचा एपिसोड खूप गाजला होता. क्रिकेटर के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या या चॅट शोमध्ये आले होते आणि त्यात त्यांनी असे काही कमेंट्स केले होते, ज्यामुळे त्यांना त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सीरिजमधून निलंबित करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने त्या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. “ती मुलाखत म्हणजे जणू वेगळंच विश्व होतं. त्या मुलाखतीने मला खूप बदललंय. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मला पूर्णपणे बदललंय. मी खूप लाजाळू आणि कमी बोलणारा मुलगा होतो. भारतासाठी जेव्हा खेळलो, तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास वाढला. अनेक लोकांच्या ग्रुपमध्येही जाण्यास मी घाबरत नव्हतो”, असं तो म्हणाला.
पश्चात्तापाची भावना व्यक्त करत तो पुढे म्हणाला, “आता मी असं काही करत नाही कारण त्या मुलाखतीमुळे मी प्रचंड घाबरलोय. टीममधून माझं निलंबन झालं होतं. मला कधी शाळेतसुद्धा असं निलंबित करण्यात आलं नव्हतं. इतकंच काय तर शाळेत मला कधी शिक्षासुद्धा झाली नव्हती. हे सर्वकाही माझ्यासोबत कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे त्याला सामोरं कसं जायचं ते मला कळत नव्हतं.” निखिल कामतच्या पॉडकास्टमध्ये के. एल. राहुल त्या मुलाखतीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ही मुलाखत इतकी वादग्रस्त ठरली होती की अखेर करण जोहरलाही तो व्हिडीओ काढून टाकावा लागला होता.
“मी शाळेत छोटी-मोठी मस्करी केली असेन पण असं कधीच वागलो नव्हतो, ज्यामुळे मला थेट निलंबित केलं जाईल. शिक्षकांकडून कधी माझी तक्रारही नव्हती. त्यामुळे त्यांनी माझ्या आईवडिलांना त्यासाठी कधीच बोलावलं नव्हतं. मुलाखतीचा फटका माझ्यासाठी पहिलाच होता आणि ते किती वाईट होतं हे मला समजलं होतं”, अशा शब्दांत राहुल व्यक्त झाला.
हार्दिक पांड्याने करण जोहरच्या चॅट शोमध्ये बरेच आक्षेपार्ह कमेंट्स केले होते. त्याच एपिसोडमध्ये राहुलसुद्धा त्याच्यासोबत बसला होता. शोमधील कमेंट्समुळे बीसीसीआयने दोघांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्या घटनेनंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला होता, “मला राग आला होता. पण ते सर्व स्वीकारून मी त्यातून पुढे निघून आलोय. एक गोष्ट मला समजली आहे की काही गोष्टी संवेदनशील असतात आणि तुम्ही काहीही केलं तरी काही लोकांना तुमच्यात वाईटच दिसतं.” हार्दिक आणि राहुलच्या त्या वादग्रस्त एपिसोडनंतर करणच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये पुन्हा कोणत्याच क्रिकेटरने हजेरी लावली नाही.