मुंबई: गायक, गीतकार म्हणून प्रशांत अम्बादे हे दलित समाजात सुपरचित आहे. आंबेडकरी जलसे आणि कव्वालीच्या क्षेत्रातही त्यांचं मोठं नाव आहे. खासकरून मुंबईतील वस्त्या आणि नागपुरात त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. मुशायरे, कव्वाल्या आणि कीर्तनांचा त्यांना छंद लागला. त्यातूनच गीतकार म्हणून त्यांची जडणघडण झाली आणि त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. कोण आहेत प्रशांत अम्बादे? जाणून घेऊया त्यांच्याविषयी. (know about journey of Lyricist prashant ambade)
प्रशांत अम्बादे हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील फुलफैल येथील रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण एमए पर्यंत झालं आहे. त्यांचे वडील नागपूरमध्ये कामानिमित्त आले आणि अम्बादे कुटुंब नागपुरातच स्थायिक झालं. वडील मोलमजुरी करायचे. त्यामुळे अम्बादे यांनाही मोलमजुरी करूनच शिक्षण करावं लागलं. नागपूरला मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात ते प्रवेश घेण्यासाठी गेले. पण महाडमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या आंबेडक महाविद्यालयात त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. त्यामुळे त्यांनी आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेतलं. या आंबेडकर महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी आहेत.
अम्बादे यांचे वडील एकतारी वाजवायचे. नागपुरात या वाद्याला किंगरी म्हणतात. त्यामुळे अम्बादेंवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार होते. घरातच संगीताचं वातावरण असल्याने त्यांना गाण्याची ओढ लागली. या ओढीतूनच ते कृष्ण-सुदामा भजनी मंडळाकडे ओढले गेले. या भजनी मंडळात त्यांना तासभर गाण्याची संधी मिळाली. त्यामुळे अंगात गाणं भिनलं. पुढे मुशायरे, कव्वाल्या आणि कीर्तनं ऐकण्याचा नाद लागला आणि त्यातूनच त्यांच्यातील गीतकार आकारास आला. विशेष म्हणजे वयाच्या 8 व्या वर्षीच त्यांनी पहिलं गीत लिहिलं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. त्यामुळे अम्बादे तेव्हापासून भजनी मंडळात जाणंही सोडलं.
हर दलित और बुद्धिस्ट के
जुबाँ पे तेरा नाम,
मेरे प्यारे भीमराव,
तुझे लाखो प्रणाम…
देव आनंद अभिनीत मुनीम सिनेमातील दाने दाने पे लिखा है या गाण्याच्या चालीवर त्यांनी लिहिलेलं हे पहिलं गीत होतं. त्यानंतर त्यांनी मागे पाहिलं नाही. आंबेडकरी गीतं लिहितानाच त्यांनी समाजातील घडामोडींवर भाष्य करणारी गाणीही लिहिली. एवढेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावरही त्यांनी गाणी लिहिली होती.
अम्बादे यांची तरुण वयात एकाचवेळी तीन तीन आघाड्यांवर कसरत सुरू होती. एक म्हणजे त्यांचं शिक्षण सुरू होतं. दुसरं म्हणजे शिक्षण घेताना कामही करत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गाणी लिहिणं आणि गायनपार्ट्यांच्या कार्यक्रमाला जाणंही सुरूच होतं. त्यावेळी तर त्यांचे कार्यक्रम मध्यप्रदेशातही व्हायचे. एकामागोमाग कार्यक्रम असल्याने त्यांना पुरेशी झोपही मिळत नसायची. अशावेळी प्रवासातच बसमध्ये ते डुलकी घ्यायचे. त्यांच्या गायन पार्टीचे मुख्य गायक प्रदीप उके, मोतीराम हिवराळे, मुन्ना, मारुती गोरले, विठ्ठल कांबळे आदी सहकारीही सोबत असायचे. (साभार: आंबेडकरी कलावंतमधून) (know about journey of Lyricist prashant ambade)
संबंधित बातम्या:
गीतकाराचा बोल जिव्हारी लागल्याने गायकीच सोडली; शीलादेवींचा हा किस्सा माहीत आहे का?
मुलाच्या निधनाची तार आली, पण शाहिरी कार्यक्रम थांबले नाही; शाहीर इंगळेंचा हा किस्सा वाचाच!
(know about journey of Lyricist prashant ambade)