मुंबई: काही गाणी त्या त्या काळात धुमाकूळ घालतात आणि नंतर लोक विसरूनही जातात. तर काही गाण्यांचा गोडवा पिढ्या दर पिढ्या वाढतच जातो. काही गाणी तर जाती-धर्माची वेसही ओलांडून जातात. आता भीमराज की बेटी मै तो… या गाण्याचंच पाहा ना. खऱ्या अर्थाने हे भीमगीत. पण आजही कोणत्याही जाती-धर्माचं लग्न असो लग्नाच्या मिरवणुकीत या गाण्याची धून वाजतेच वाजते. (know all about singer pratap singh bodade)
कुणी लिहिलं गाणं?; कुणी गायलं गाणं?
उमर में बाली भोली भाली,
शील की झोली हूँ,
भीमराज की बेटी मैं तो,
जयभीमवाली हूँ…
दुश्मन भी मुझसे डरे,
गर टकराये तो मरे,
चीर सके दुश्मन का सीना,
मै वो गोली हूँ,
अरे भीमराज की…
आंबेडकरी समाजातील सर्वात उच्च शिक्षित गायक प्रतापसिंग बोदडे यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. तर बाबू टांगेवाला, माझ्या जीवाचा मैतर झाला… या गाण्याच्या प्रसिद्ध गायिका शकुंतला जाधव यांनी हे गाणं गायलं आहे. प्रचंड आजारी असतानाही शकुंतला जाधव यांनी हे गाणं गायलं. या गाण्याने लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. वाड्या वस्त्यात, शहरात हे गाणं हिट झालंच. शिवाय या गाण्याने जाती-धर्माच्या सीमाही ओलांडल्या. गाण्याचे शब्द, गायिकेचा आवाज आणि ठेका धरायला लावणारं संगीत… अप्रतिम भट्टी जमल्याने हे गाणं अत्यंत लोकप्रिय ठरलं.
कोण आहेत प्रतापसिंग बोदडे?
प्रतापसिंग बोदडे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे. त्यांचे वडील बालचंद बोदडे हे नावाजलेले तमासगीर होते. प्रतापसिंग बोदडे यांचा आजोळी म्हणजे यावल तालुक्यातील बामनोद येथे झाला. त्यांच्या घरातच गाणं होतं. तो वारसा त्यांच्याकडे आला. पण ते तमाशाकडे कधीच फिरकले नाहीत. त्यांनी त्यांचं लिहिणं आणि गाणं आंबेडकरी चळवळीला अर्पण केलं. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमध्ये पदवीपर्यंत शिक्षण झाल्याने बोदडे यांचा आंबेडकरी चळवळीशी संपर्क आला होता. शिवाय प्रसिद्ध कवी, गायक वामनदादा कर्डक यांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचं ध्येय ठरलं होतं. त्यामुळेच त्यांनी तमाशा नाकारला होता.
इंग्रजीला जीभेवर नाचवलं
बोदडे यांचं मॅट्रीकपर्यंतचं शिक्षण गावीच झालं. मॅट्रीकला इंग्रजीत नापास झाल्यावर निराश होण्याऐवजी त्यांनी इंग्रजीला जीभेवर नाचवण्याची शपथ घेतली अन् ही शपथ पूर्णही केली. ऑक्टोबरमध्ये मॅट्रीकचा विषय सोडवल्यानंतर ते औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात दाखल झाले. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सरचिटणीस म. भि. चिटणीस हे मिलिंदचे प्राचार्य होते. तर माजी राज्यमंत्री प्रितमकुमार शेगावकर हे बोदडेंना सीनियर आणि पँथर नेते गंगाधर गाडे हे त्यांचे क्लासमेट होते. त्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण मराठीत दिलं जायचं. त्याला बोदडेंनी विरोध केला आणि इंग्रजीत शिक्षण देण्याची मागणी केली. प्राचार्य चिटणीस यांनी त्यांची ही सूचना तात्काळ मान्य करून इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरुवात केली. बोदडे यांनी इंग्रजी विषय घेऊनच एम.ए. केले. इंग्रजी सुधारण्यासाठी टाईम्स ऑफ इंडिया वाचणे, रेडिओवरील बीबीसी लंडनच्या बातम्या ऐकण्यास सुरुवात केली. मंत्रालयातील निवृत्त सहायक सचिव प्रितम आठवले यांनी त्यांना इंग्रजी शिकण्याची प्रेरणा दिली होती.
इंग्रजी नाटकात काम
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेक्सपियरच्या अॅज यू लाईक इट या इंग्रजी नाटकात काम केलं. पुढे इंग्रजी नाटकांमध्ये काम करणं हा त्यांचा छंदच झाला. त्यांना महाविद्यालयाने मिस्टर मिलिंद हा पुरस्कार देऊनही गौरवले होते.
वामनदादांचा प्रभाव
त्याकाळी वामनदादा कर्डकांची गाणी जात्यापासून शेतापर्यंत आणि गिरणीपासून ते मोर्च्यापर्यंत गायली जायची. त्यामुळे त्यांच्यावर वामनदादांचा प्रभाव पडला. वामनदादांचे औरंगाबादला सतत जाणेयेणे असायचे. त्यांचे गायनपार्ट्या व्हायच्या. त्यामुळे बोदडे वामनदादांच्या पाठी बसून कोरसमध्ये सामिल व्हायचे. 1968 ते 1970 या काळात वामनदादांच्या पाठी बसून त्यांनी कोरस केले होते. पण त्यांना गाण्याची संधी कधी मिळाली नव्हती. 1970मध्ये औरंगाबादच्या आंबेडकर महाविद्यालयात वामनदादांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी बोदडे वामनदादांच्या पाठी बसून कोरस देत होते. तीन चार गाणी झाल्यावर वामनदादांना तंबाखू खाण्याची हुक्की आली आणि त्यांनी ज्यांना गाणं गायचं आहे, त्यांनी पुढे या असं सांगितलं. वामनदादांनी तोंडातून शब्द काढायचीच खोटी की बोदडेंनी तात्काळ माईकचा ताबा घेतला आणि स्वरचित गाणं म्हटलं. ते गाणं होतं…
मी तर शिष्य भीमाचा,
जातो बुद्ध विहाराला,
संग चला रे चला….
त्यांचं गाणं, सादरीकरण ऐकून वामनदादा खूश झाले. त्यांनी बोदडेंना आणखी एक गाणं गायला सांगितलं. ते गाणं होतं…
थांबा हो थांबा, गाडीवान दादा,
बाळ एकटा मी, भीमा माझं नाव,
राहिले फार दूर माझे गाव,
गाडीत घ्या हो मला…
बोदडेंनी हे गाणं अत्यंत तन्मयतेने गायलं. त्यांचं गाणं ऐकून वामनदादाही भारावून गेले आणि त्यांनी बोदडेंच्या पाठीवर थाप मारत त्यांचं भरभरून कौतुक केलं. तसेच कवी म्हणून बोदडेंवर शिक्कामोर्तबही केलं. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know all about singer pratap singh bodade)
संबंधित बातम्या:
पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!
‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का?
(know all about singer pratap singh bodade)