मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा आठवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. आता दुसऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय भावंडं म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल हे पाहुणे म्हणून आल्याचं दिसत आहे. सनी आणि बॉबी देओलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत देओल कुटुंबाची वेगळीच लोकप्रियता आहे. त्यामुळे या दुसऱ्या एपिसोडची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे.
या एपिसोडमध्ये सनी आणि बॉबी देओल हे त्यांच्या करिअर आणि आगामी चित्रपटांबद्दल मोकळेपणे गप्पा मारतात. यादरम्यान बॉबी देओल म्हणतो, “सलमान भाईने मला एकदा म्हटलं होतं की, हे बघ जेव्हा माझं करिअर ठीक चालत नव्हतं, तेव्हा मी तुझ्या भावाच्या पाठीवर चढलो आणि पुढे निघून आलो. हे ऐकून मी म्हणालो, मामू मग मला तुझ्या पाठीवर चढू दे ना.” देओल भावंडांसोबत करण जोहरच्या खुमासदार गप्पा रंगणार आहेत, हे या प्रोमोतून स्पष्ट जाणवतंय.
या प्रोमोमध्ये देओल भावंडांनी वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवरही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांचा आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचा किसिंग सीन होता. त्याची बरीच चर्चा झाली होती. त्यावर बॉबी म्हणतो, “तुझा चित्रपट आम्हाला खूप आवडला. आम्ही मस्करी करत होतो की पापा किस पण करत होते. पण कोणी बोलो अथवा न बोलो, ते खूप क्यूट आहेत.” यानंतर करण जेव्हा सनी देओलची प्रतिक्रिया विचारतो, तेव्हा तो म्हणतो, “डॅड त्यांना आवडीची कोणतीही गोष्ट करू शकतात आणि त्यातून ते आरामात निसटूनही जातात.”
‘कॉफी विथ करण 8’च्या या एपिसोडमध्ये करण आणि सनी देओल हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही चर्चा करतात. हे आकडे खोटे असतात की खरे, त्यावर सनी देओल काय म्हणतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण प्रोमोमध्ये देओल भावंडं हसताना आणि करणशी खुलून गप्पा मारताना दिसत आहेत. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली, तर काहींनी देओल भावंडांच्या उपस्थितीवरून सवाल केला आहे.