मुंबई : आर्यन खान लाचप्रकरणी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी होत असतानाच पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. क्रांतीने याआधीही सोशल मीडिया पोस्ट किंवा मुलाखतींद्वारे वानखेडे यांची साथ दिली. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘जे काम तू सर्वोत्तम करतोस ते काम करण्यासाठी तुला तुझी वेळ आणि ऊर्जेचा वापर करण्याची संधी मिळू दे. ते काम म्हणजे देशाची सेवा’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचसोबत ‘जय हिंद’ आणि ‘राष्ट्रसर्वोपरी’ असे हॅशटॅग तिने वापरले आहेत.
क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये समीर वानखेडेंनी आजवर ज्या ज्या कारवाया केल्या, त्यांचे फोटो पहायला मिळत आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल वर्तमानपत्रात छापून आलेले लेख, बातम्या यांचेही फोटो दिसत आहेत. जनतेकडून त्यांना मिळणारा पाठिंबा आणि प्रेम याचीही झलक या व्हिडीओत दिसतेय. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला क्रांतीने ‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’ हे गाणं लावलं आहे.
याआधीही क्रांतीने कलियुगाची कथा सांगत कोणाचंही नाव न घेता चालू घडामोडींवर निशाणा साधला होता. “माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की ही पृथ्वी काही मोजक्या चांगल्या लोकांमुळे चालतेय. अशी लोकं खूपच कमी आहेत. आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की त्यांची साथ द्यायची आहे. मी चांगल्या व्यक्तींच्या सोबत आहे. तुम्ही त्यांच्यासोबत आहात का”, असा सवाल तिने या व्हिडीओतून केला होता.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून सोडविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आहे. या आरोपांवरील तपासासाठी एनसीबीचे माजी उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली वानखेडेंची विभागीय चौकशी झाली. त्या चौकशीच्या रिपोर्टवरून सीबीआयने रविवारी आणि सोमवारी समीर वानखेडेंची जवळपास पाच ते सहा तास चौकशी केली.