लोकसभा निवडणुका तोंडावर असताना कलाविश्वातील बरेच सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. अभिनेत्री कंगना राणौतनेही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तर गुरुवारी अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री क्रिती सनॉनला राजकारणात पाऊल ठेवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. एका समिटदरम्यान क्रितीला राजकारणाविषयी तिचं मत मांडण्यास सांगण्यात आलं होतं. यावेळी क्रिती मोकळेपणे व्यक्त झाली.
“मी कधीच त्याचा विचार केला नाही. जोपर्यंत मला मनापासून एखादी गोष्ट आवडत नाही किंवा माझी मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत मी कधीच हे करेन किंवा ते करेन असं ठरवत नाही. जर एकेदिवशी माझ्या मनात आलं की मला यापेक्षा काही अधिक करायचं आहे, तर तेव्हा नक्की करेन. ठराविक वेळेनंतर गिअर शिफ्ट केली पाहिजे आणि ज्या गोष्टी आपण आधी केल्या नाहीत, त्या करण्याचं आव्हान स्वीकारलं पाहिजे”, असं क्रिती म्हणाली.
क्रितीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास तिचा ‘क्रू’ हा चित्रपट आजच (29 मार्च) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये क्रितीसोबतच तब्बू आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राजेश ए. कृष्णन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तब्बू आणि करीनासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना क्रिती म्हणाली, “आम्ही सहसा पुरुषांसोबत काम करतो. पण महिलांसोबत काम करण्याचा अनुभव मनाला ताजंतवानं करणार आहे. तब्बू आणि करीना अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं.”
अभिनेत्री कंगना राणौत भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. 23 मार्च रोजी भाजपकडून 111 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये कंगनाशिवाय अभिनेते अरुण गोविल यांचाही समावेश होता. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी श्रीराम यांची भूमिका साकारली होती. मेरठ या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.