मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून अद्याप वाद सुरू आहे. या चित्रपटातील कलाकारांचा लूक, त्यातील सीन्स, डायलॉग्स आणि व्हीएफएक्स यांवरून प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रतिक्रियांमुळे आता बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून येत आहे. सर्वसामान्यांसोबतच बरेच सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप नोंदवत आहेत. अशातच अभिनेत्री क्रिती सनॉनची आई गीता सनॉन यांनी ‘आदिपुरुष’च्या वादावर मौन सोडलं आहे. क्रितीने या चित्रपटात जानकीची (सीता) भूमिका साकारली आहे. तर प्रभासने राघव (राम), सैफ अली खानने लंकेश (रावण), सनी सिंहने शेष (लक्ष्मण) आणि देवदत्ता नागेनं बजरंगची (हनुमान) भूमिका साकारली आहे.
“जाकी रही भावना जैसी, प्रभू मुरत देखी तिन तैसी”, या पंक्तींचा अर्थ सांगत त्या म्हणाल्या, “याचा अर्थ असा आहे की जर तुमची मानसिकता आणि दृष्टीकोन चांगला असेल तर जग तुम्हाला फक्त सुंदरच दिसेल. प्रभू श्रीराम यांनी स्वत: आपल्याला हेच शिकवलं आहे की शबरीच्या फळांमध्ये प्रेम शोधा. ते फळ उष्टे आहेत याकडे लक्ष देऊ नका. अशा प्रकारे आपण चुकांकडे दुर्लक्ष करून भावना समजून घेतल्या पाहिजेत. जय श्री राम!”
गीता सनॉन यांनी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट लिहिली आहे. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘भावनांचाच तर सगळा खेळ आहे. या चित्रपटाने लोकांच्या भावनांनाच समजून घेतलं नाही. उलट तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करत आहात की आम्ही त्यांच्या भावना समजून घ्याव्यात’, अशा शब्दांत एका युजरने राग व्यक्त केला. तर ‘आपल्या इतिहासाचा इतका मोठा अपमान सहन करून त्यांची बाजू घेणं कितपत योग्य आहे’, असा सवाल दुसऱ्याने केला. आदिपुरुष या चित्रपटात कोणत्याच भावना नाहीत, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
आदिपुरुष या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कमी होत असलेला पाहून निर्मात्यांनी आता तिकिटावर ऑफर दिली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या चित्रपटाचं तिकिट 150 रुपयांना मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. मात्र यातील कलाकारांच्या भूमिका, त्यांचा लूक, व्हीएफएक्स आणि डायलॉग्स यांवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. रामायण कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ हा चित्रपट असल्याची टीका अनेकांकडून होत आहे.