नाशिक : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव तर अभिनेत्री क्रिती सनॉनने जानकीची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर आता निर्मात्यांनी ‘राम सिया राम’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित केलं आहे. आदिपुरुषच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असता क्रितीने सिता गुफा मंदिराला भेट दिली आहे. वनवासात असताना राम आणि सीता या गुफेत राहिल्याचं म्हटलं जातं. यावेळी क्रितीसोबत प्रसिद्ध गायकांची जोडी साचेत आणि परंपरासुद्धा होते. त्यांच्यासोबत मिळून क्रितीने मंदिरात आरती केली.
मनोज मुंतशीर लिखित ‘राम सिया राम’ हे गाणं साचेत आणि परंपरा या जोडीनेच गायलं आहे. राम आणि सीता यांच्यातील बंधावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात ‘जानकी राघव की है और राघव की ही रहेगी’ असा संवाद क्रितीच्या तोंडी आहे.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांची मुदत वाढवून घेतली.
“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाले.
या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे. टी-सीरिजचे निर्माते भूषण कपूर चित्रपटाविषयी म्हणाले, “सुरुवातीला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद नेहमीच पुढे जाऊन कामी येतो. आम्ही थोडे निराश झालो होतो. पण आम्ही पुन्हा चित्रपटावर मेहनत घेतली. घडलेल्या गोष्टींमधून आम्ही शिकलो आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी सुचवलेल्या गोष्टींनुसार आम्ही काही बदल केले. आता आम्ही जो चित्रपट बनवला आहे, त्यावर खूप खुश आहोत.”