अभिनेत्री क्रिती सनॉनचे ‘क्रू’ आणि ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हे या वर्षातील दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. मात्र गेल्या वर्षी क्रितीने तिच्या करिअरमधील सर्वांत फ्लॉप चित्रपट दिला होता. या चित्रपटाचं नाव होतं ‘आदिपुरुष’. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित होती. त्यात क्रितीन सीतेची, प्रभासने श्रीरामाची आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली होती. यातील संवाद, व्हिज्युअल इफेक्ट्स, कलाकारांचा लूक यावरून नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. तब्बल 500 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. अनेकांनी चित्रपटावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. हे पाहून निर्मात्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. आता जवळपास वर्षभरानंतर क्रितीने चित्रपटाच्या अपयशावर मौन सोडलं आहे.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर टीकेला कशी सामोरी गेलीस, असा प्रश्न क्रितीला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “असं काही घडतं तेव्हा तुम्हाला खूप दु:ख होतं आणि कदाचित तुमच्या डोळ्यांतही अश्रू येतात. नेमकं कुठे चुकलो, असा प्रश्न पडतो. आम्हाला कोणाच्याच भावना दुखवायच्या नव्हत्या. प्रत्येक प्रोजेक्टमागील हेतू हा सकारात्मकच असतो. पण कधीकधी आपल्याला सत्याला सामोरं जावं लागतं. प्रेक्षकांना काही गोष्टी आवडत नाहीत आणि अशा अनुभवांमधून शिकणं खूप महत्त्वाचं असतं.”
“एक कलाकार म्हणून माझी सर्वोत्तम भूमिका हीच असेल की एकाग्र राहण्याचा प्रयत्न करणं. तुम्ही तुमची मेहनत करत राहा आणि पुढील प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करा. काही गोष्टी आपल्या नियंत्रणापलीकडे असतात. पण माझ्या प्रयत्नांनी मी प्रत्येक भूमिका चांगली साकारण्याचा प्रयत्न नक्की करेन”, असं ती पुढे म्हणाली.
चित्रपटाबाबत एखाद्याची प्रामाणिक टीका असेल तर ते मान्य करेन, पण काहीजण दुसऱ्या गोष्टींच्या संतापातून सोशल मीडियावर कमेंट करतात, जे मला आवडत नाही, असंही क्रितीने स्पष्ट केलं. “घरी चित्रपट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांना कोणत्या गोष्टी आवडल्या आणि कोणत्या नाही, हे त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीचा फिडबॅक उपयोगाचा असतो. पण सर्वच प्रकारच्या टीका तुम्ही मनावर घ्यायच्या नसतात,” असं क्रिती पुढे म्हणाली.
साऊथ सुपरस्टार प्रभास, कृती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंह यांच्या भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा निर्मात्यांना वाटलं होतं की हा जबरदस्त कमाई करेल. मात्र चित्रपटावर जोरदार टीका झाली होती. छपरी डायलॉग्स, भयकंर VFX असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं होतं. क्रितीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘दो पत्ती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. यामध्ये तिच्यासोबत काजोलचीही भूमिका आहे.