‘मी जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तिथे..’; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोमणा

| Updated on: Apr 01, 2025 | 9:44 AM

सोमवारी मुंबई पोलीस कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतल्या घरी पाहणीसाठी गेले होते. त्यानंतर त्याने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित पोलिसांना टोला लगावला आहे. कुणाल गेल्या दहा वर्षांपासून त्या घरात राहत नाही.

मी जिथे 10 वर्षांपासून राहत नाही तिथे..; कुणाल कामराचा मुंबई पोलिसांना टोमणा
कॉमेडियन कुणाल कामरा
Follow us on

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा कॉमेडियन कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी सोमवारी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. या पाहणीवरून कुणालने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने अधिकाऱ्यांवर वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय केल्याबद्दल जोरदार टीका केली. कामराने किमान दहा वर्षांपासून त्या पत्त्यावर राहत नसल्याचं सांगून तामिळनाडूतील त्याच्या सध्याच्या घराच्या टेरेसवरून स्वत:चा एक फोटो शेअर केला.

“मी गेल्या दहा वर्षांपासून जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे”, असं कामराने लिहिलंय. या प्रकारानंतर त्याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्याला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स पाठवलं होतं. त्यात त्याला सोमवारी खार पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. पण तो अनुपस्थित राहिल्यामुळे पोलीस पथकाने माहीम इथल्या त्याच्या वडिलांच्या घरी जाऊन पाहणी केली. यापूर्वी याच ठिकाणी पोलिसांनी दोन समन्स बजावले होते.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात शुक्रवारी कामराने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने कामराला अंतरिम दिलासा दिला होता. कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील तीन गुन्हे नाशिक ग्रामीण, जळगाव आणि नाशिक (नांदगाव) इथून वर्ग करण्यात आले आहेत. मनमाड इथल्या शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनीही कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय जळगावचे शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख संजय भुजबळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक नांदगाव इथल्या सुनील शंकर जाधव यांच्या तक्रारीप्रकरणी दाखल गुन्हाही खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यासह शिवसेना नेते मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.