मुंबई- अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. याचा परिणाम लाल सिंग चड्ढाच्या कमाईवरही झाला. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. त्यानंतर काही दिवस तो टॉप ट्रेंडिंगमध्ये होता. आता या चित्रपटाचा लेखक अतुल कुलकर्णीने त्याविषयी आनंद व्यक्त केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुलने चित्रपटाशी संबंधित काही वादावरही प्रतिक्रिया दिली आहे.
ओटीटीवर लाल सिंग चड्ढाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल अतुल म्हणाला, “आम्ही थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या प्रेमाला खूप मिस केलं. आम्ही लोकांसाठी चित्रपट बनवतो आणि जेव्हा त्यांना चित्रपट आवडतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. हा चित्रपट प्रेमाबद्दल आहे, निरागसतेबद्दल आहे. चित्रपटातील लालच्या मनात कोणताच द्वेष नाही. उशिरा का होईना पण चित्रपटाला प्रेम मिळतोय याचा मला आनंद आहे.”
“जेव्हा मी हा चित्रपट भारताच्या दृष्टीकोनातून लिहित होतो, तेव्हा मी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं, जे आपल्या देशात आहेत, अमेरिकेत नाही. उदाहरणार्थ धर्म किंवा दहशतवाद.. हे अमेरिकेत नाही. भारताबद्दल बोलायचं झालं तर या गोष्टी सहज लक्षात येतात. देशात धर्मावरून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर मला चित्रपटातून बोलायचं होतं. माझ्या मते, कोणत्याही द्वेषाचं उत्तर धर्म नाही तर प्रेम, आदर, करूणा आणि क्षमा आहे”, असं तो पुढे म्हणाला.
जवळपास 180 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट थिएटरमध्ये महिनाभरसुद्धा टिकू शकला नव्हता. पहिल्या दिवशी लाल सिंग चड्ढाने फक्त 11.7 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने भारतात जवळपास 61.36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामध्ये आमिरसोबतच करीना कपूर खान, नाग चैतन्य, मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत.