आपल्या समाजात अजूनही घटस्फोटीत स्त्रीकडे किंवा एकट्या बाईकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा संकुचितच आहे असं म्हणावं लागेल. एकटं राहण्याचा निर्णय घेणं हे आधीच स्त्रीसाठी अवघड असतं आणि तो निर्णय घेतल्यानंतरही तिला इतरांकडून अपेक्षित अशी साथ मिळत नाही. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या अरुंधतीसुद्धा अशाच घटनांचा सामना करतेय. देशमुख कुटुंबीयांकडून तिच्या चारित्र्यावर चिखलफेक झाल्यानंतर अरुंधतीने (Arundhati) ते घर कायमस्वरुपी सोडलं. घर सोडल्यानंतर तिने आता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. बरीच वर्षे पतीसोबत, सासू-सासऱ्यांची सेवा करत, मुलाबाळांचा सांभाळ करत राहणाऱ्या अरुंधतीला असा निर्णय घेण्यासाठी बराच धीर लागला. पण जुन्या अरुंधतीसारखं सर्वकाही सहन करत बसण्यापेक्षा तिने वेगळं राहण्याचा निर्धार केला, हाच तिच्यातील मोठा बदल प्रेक्षकांना मालिकेत पहायला मिळत आहे. (Marathi Serial)
‘एकटी बाई म्हणजे जोखिम’
देशमुखांचं घर सोडल्यानंतर अरुंधती काही दिवस तिच्या आईकडे राहायला आली आहे. स्वतंत्र राहण्यासाठी तिने घराची शोधाशोध सुरू केली आहे. मालिकेच्या शुक्रवारच्या भागात अरुंधतीचा हाच संघर्ष प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अरुंधती एकटीच आहे, म्हणून घरमालकीण तिला भाड्याने घर देण्यास नकार देते. एकटी बाई म्हणजे जोखिम असते, असं ती अरुंधतीला म्हणते. आपल्याला आता पावलोपावली अशा समस्यांचा सामना करावाच लागणार, याची कल्पना तिला कदाचित आली असावी. म्हणूनच तिने बिनधास्तपणे घरमालकिणीच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. अरुंधती आता यातून कसा मार्ग काढणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. दुसरीकडे विमलला अरुंधतीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळते. अरुंधतीला दिलेली वाईट वागणूक तिलाही सहन होत नाही.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अनिरुद्ध आणि कांचन देशमुख यांना त्यांची चूक समजेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.
संबंधित बातम्या: आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला तिचा घरावरचा हक्क; कांचन देशमुखांवर भडकले नेटकरी