मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘लापतागंज’मध्ये चौरसियाची भूमिका साकारणारा अभिनेता अरविंद कुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार ते शूटिंगला जात होते आणि रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अरविंद कुमार यांच्या निधनाची माहिती सहकलाकार रोहिताश्व गौड यांनी दिली. याशिवाय त्यांच्या पत्नीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. आर्थिक समस्यांमुळे ते फार तणावात होते अशी माहिती रोहिताश्व यांनी दिली. रोहिताश्व आणि अरविंद कुमार यांनी ‘लापतागंज’ मालिकेत एकत्र काम केलं होतं.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत रोहिताश्व म्हणाले, “होय हे खरं आहे. दोन दिवसांपूर्वी अरविंदचं निधन झालं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. लापतागंज हा शो संपल्यानंतरसुद्धा आम्ही फोनवर एकमेकांच्या संपर्कात होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आणि आर्थिक समस्यांमुळे तो खूप तणावात होता. याविषयी तो माझ्याशी बोलायचा, कारण कोरोना महामारीनंतर कलाकारांसाठी गोष्टी खूप अवघड झाल्या आणि त्यात तोसुद्धा संघर्ष करत होता. अशा कठीण काळात कोणीच पुढे येऊन मदत करत नाहीत. सुदैवाने मला काम मिळालं. तणावामुळे हृदयविकाराचा येतो. त्याचे कुटुंबीय गावी राहताता, त्यामुळे मी कधीच त्यांच्याशी बोललो नाही किंवा भेटलो नाही.”
काही मित्र मिळून अरविंद कुमार यांच्या कुटुंबीयांना गावी आर्थिक मदत पाठवणार असल्याची माहिती रोहिताश्व यांनी दिली. “मला त्याच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला आहे. आम्ही सर्व मित्र मिळून त्याच्या पत्नी आणि मुलांची जेवढी मदत शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दलची प्लॅनिंग सुरू आहे. हीच गोष्ट अभिनेता दीपेश भान यांच्यासोबतही घडली होती. त्यावेळी अभिनेत्री सौम्या टंडनने नेटकऱ्यांकडे मदत मागितली आणि त्यांच्या कुटुंबीयांना ती मदत पुरविण्यात आली. आम्हीसुद्धा असंच काहीसं करण्याचा विचार करत आहोत”, असं ते पुढे म्हणाले.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सौम्या टंडनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिवंगत अभिनेता दीपेश भान यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सौम्याने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात तिने चाहत्यांना दीपेश यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी देणगी आणि मदत करण्याची विनंती केली होती.