नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘रामायण’च्या सेटवरील काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये अभिनेते अरुण गोविल हे दशरथ यांच्या भूमिकेत आणि अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत पहायला मिळाली. आता पहिल्यांदाच लाराने या चर्चांवर मौन सोडलं आहे. त्याचप्रमाणे तिने चित्रपटाविषयी मोठी हिंटसुद्धा दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लारा म्हणाली, “मीसुद्धा त्याबद्दल खूप ऐकतेय. पण मी त्या चर्चा तशाच होऊ देणार आहे. कारण त्याविषयी वाचायला आणि ऐकायला मलासुद्धा आवडतंय. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल चर्चा करत राहा. रामायणसारख्या चित्रपटात कोणाला काम करायला आवडणार नाही? जर मला ऑफर दिली तर रामायणातील अशा अनेक भूमिका आहेत, ज्या साकारण्याची माझी इच्छा आहे. शुर्पणखा, मंडोदरी.. मी त्या सर्व भूमिका साकारतेय (हसते).” रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय चित्रपटातील इतरही भूमिकांसाठी काही कलाकारांच्या नावांची चर्चा आहे.
Shooting for #NiteshTiwari‘s #Ramayana begins. #ranbirkapoor in Mumbai! pic.twitter.com/l5JR93llTd
— Filmi Files (@Filmifiles) April 3, 2024
‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. या भूमिकेसाठी तो फारच उत्सुक आहे.
यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.