राज्यातील दैनंदिन कोविड (COVID 19) रुग्णसंख्या वेगाने घटतेय. तर मुंबईतील रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून कमी होतेय. मात्र नुकतंच अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) कोरोनाची लागण झाली. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) तिचं घर सील केलं असून तिच्या घराचा परिसर हा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सुदैवाने लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. गुरुवारी मुंबईत 54 नवे रुग्ण आढळले आणि आज (शुक्रवारी) लाराचं घर महापालिकेकडून सील करण्यात आले. नव्याने आढळलेल्या 54 रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचं पहायला मिळतंय. सध्या रुग्णालयात केवळ 27 रुग्ण दाखल आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्या आता वेगाने घटत असल्यामुळे रुग्णांची संख्या ही हजाराच्या खाली गेली आहे. सध्या राज्यात 956 रुग्ण उपचाराधीन आहेत. एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच ही संख्या इतकी खाली गेली आहे. कोविडची पहिली आणि दुसरी लाट ओसरली तरी राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली कधीच गेली नव्हती.
नुकतंच लाराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिची मुलगी आणि अभिनेत्री सेलिना जेटलीच्या मुलांसोबतचा जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने सेलिनाच्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. लाराच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, ती ‘बेल बॉटम’ या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरेश यांच्यासोबत झळकली होती. लाराने डिजिटल प्लॅटफॉर्मवरीलही काही प्रोजेक्ट्स केले आहेत.
हेही वाचा: