मुंबई: स्वरकोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. लतादीदींना जाऊन वर्ष झालं, मात्र त्यांच्या असंख्य आठवणी या चाहत्यांच्या मनात कायम आहेत. गानसम्राज्ञी लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारहून अधिक गाणी गायली होती. त्यांचा आवाज ऐकून श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. एका मुलाखतीत लतादीदींना पुढच्या जन्मीसुद्धा लता मंगेशकर व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं होतं. यामागचं कारणसुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं.
लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, “मला पुन्हा कधी लता मंगेशकर बनायचं नाहीये. लोकांनी फक्त लताचं ऐश्वर्य पाहिलं पण जो त्रास होता, तो फक्त मीच सहन केला आहे.” लतादीदींनी लहानपणापासूनच असंख्य दु:ख झेललं होतं. त्या लहान असतानाच वडिलांचं निधन झालं होतं. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या चार लहान भावंडांमध्ये सर्वांत मोठी बहीण असल्याच्या नात्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती.
लतादीदींनाही संगीत क्षेत्रात अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी आपल्या सुमधूर गायनाच्या शैलीने आणि आवाजाच्या जादूने जगभरातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘लता सूर गाथा’ या पुस्तकात लतादीदींचा संघर्ष मांडण्यात आला आहे. या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, काहीही झालं तरी मला माझ्या कुटुंबाला बघायचंय, असा विचार सतत त्यांच्या मनात असायचा. जास्तीत जास्त पैसे कमवून कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करायच्या, यातच त्यांचा सगळा वेळ जायचा.
लतादीदींवर 8 जानेवारी 2022 पासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. न्युमोनिया आणि कोरोनातून त्या बऱ्या झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘अजीब दास्तान है ये’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘आप की नजरों ने समझा’, ‘कही दीप जले कही दिल’ यांसह त्यांची असंख्य गाणी आजही लोकप्रिय आहेत. लतादीदींना भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.