मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : गानकोकिळा लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या असंख्य आठवणी आणि मंत्रमुग्ध करणारा त्यांचा आवाज आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. लतादीदींनी त्यांच्या करिअरमध्ये 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारांहून अधिक गाणी गायली होती. त्यांचा आवाज ऐकून श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांच्या निधनाच्या दीड वर्षानंतर कुटुंबीयांनी लतादीदींची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमला देणगी देण्याची त्यांची अखेरची इच्छा होती. त्यानुसार कुटुंबीयांनी देवस्थानमला 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
मंगेशकर कुटुंबीयांकडून तिरुमला तिरुपती देवस्थानमला पत्र लिहिण्यात आलं होतं. त्या पत्रात त्यांनी लता मंगेशकर यांच्या शेवटच्या इच्छेचा उल्लेख केला होता. त्यानंतर मुंबईतील तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डचे सदस्य मिलिंद केशव नार्वेकर यांच्याशी बहीण उषा मंगेशकर यांनी संपर्क साधला. मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने मंदिराला देणगी सोपवण्याची विनंती त्यांनी नार्वेकर यांच्याकडे केली.
सोमवारी नार्वेकर यांनी 10 लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश तिरुमला इथं TTD चे अध्यक्ष भूमना करुणाकर रेड्डी यांच्या उपस्थितीत तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांच्याकडे सोपवला. लता मंगेशकर यांची भगवान व्यंकटेश्वर यांच्यावर खूप श्रद्धा होती. त्यांनी तिरुपती ट्रस्टच्या दरबारी संगीतकार म्हणूनही काम केलं होतं. 2010 मध्ये लतादीदींनी जवळपास दहा तल्लापाका अन्नमाचार्य संकीर्तन सादर केले होते. TTD च्या एस. व्ही. रेकॉर्डिंग प्रोजेक्टद्वारे ते रेकॉर्ड करण्यात आलं होतं आणि नंतर ‘अन्नमय्या स्वर लतार्चना’ या नावाने ऑडिओ सीडी प्रसिद्ध करण्यात आली.
लतादीदी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या चार लहान भावंडांमध्ये सर्वांत मोठी बहीण असल्याच्या नात्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. लतादीदींनाही संगीत क्षेत्रात अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी आपल्या सुमधूर गायनाच्या शैलीने आणि आवाजाच्या जादूने जगभरातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘लता सूर गाथा’ या पुस्तकात लतादीदींचा संघर्ष मांडण्यात आला आहे.