मुंबई : 13 डिसेंबर 2023 | दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र यांनी बंधू लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावर मात केल्यानंतर 2011 मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं. आजारपणातही त्यांनी नाटकाची आवड कायम जपली. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. सिंघम, चिंगी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 1965 पासून त्यांची नाट्यसृष्टीशी नाळ जोडली गेली. हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, भुताची शाळा, गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.
रवींद्र बेर्डे यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांची अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबतची जोडी हिट ठरली होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.