मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. मात्र त्यांच्या निधनानंतर सबंध चित्रपटसृष्टीवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनीच मुलांचा सांभाळ केला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया यांनी संघर्षाच्या आठवणींचा उजाळा दिला. पतीच्या निधनानंतर केलेला संघर्ष आठवताना त्या भावूक झाल्या होत्या. एकल माता म्हणून मुलांचा सांभाळ करणं, त्यांना लहानाचं मोठं करणं किती कठीण असतं, याविषयी त्यांनी सांगितलं.
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्ट मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी एकटीच अभिनय आणि स्वानंदीचा सांभाळ करत होते. एकीकडे करिअर करत असताना दुसरीकडे मला माझ्या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं. ते दोघं पुण्यातल्या एका हॉस्टेलमध्ये राहायचे. मला आई-वडील, सासू-सासरे, भाऊ-बहीण नाहीत. जरी असते तरी त्यांनी माझ्या मुलांचा सांभाळ करावा, अशी मी अपेक्षा केली नसती. कारण प्रत्येकाला आपापला संसार सांभाळायचा असतो. त्यामुळे लक्ष्मीकांत गेल्यावर माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं. माझी मुलं दहावीपर्यंत हॉस्टेलमध्येच होती. मुलांना एक-दोन महिन्यांनी मी मोठं होताना पाहायचे.”
“लक्ष्मीकांत आजारी असतानाच मला कळून चुकलं होतं की आता काही ठीक होणार नाही. आपल्याला परिस्थितीला सामोरं जावंच लागणार, हे मला समजत होतं. तेव्हा मला जाणवलं की आता कुठेतरी मला सिंधुताई व्हावं लागणार आहे. त्यावेळी मी तीन मुलांचा सांभाळ करत होते”, असं बोलताना प्रिया बेर्डे भावूक झाल्या. संघर्षाच्या त्या परिस्थितीतून जाताना मी जे सहन केलं ते कोणीच करू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.