लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आपला तगडा उमेदवार मतदारसंघात पाठवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी केवळ राजकीय क्षेत्रातूनच नाही तर मनोरंजन क्षेत्रातील नामवंतांचाही विचार केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता गोविंदाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आता शिंदे गट काही मराठी कलाकारांनाही रिंगणात उतरवण्याची तयारी करत असल्याचं कळतंय. यासाठी त्यांनी काहींची चाचपणीदेखील सुरू केली आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी काही मराठी कलाकारांची चाचपणी सुरू असल्याचं समजतंय.
उत्तर-पश्चिम मतदारसंघात मराठी किंवा अमराठी यापैकी कोणाला सर्वाधिक पाठिंबा मिळू शकतो, याचं सर्वेक्षण शिंदे गटाकडून करण्यात आलं. या मतदारसंघासाठी नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांची चाचपणी सुरु असल्याचं कळतंय. पण निरुपम हा अमराठी चेहरा असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून फारसा कौल मिळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिंदे गटाने आता मराठी कलाकारांच्या नावांची चाचपणी सुरू केली आहे. अभिनेत शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर यांची सध्या चाचपणी सुरू आहे.
शरद पोंक्षे हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत येतात. सोशल मीडियावर किंवा विविध कार्यक्रमांमध्ये ते त्यांची हिंदुत्त्ववादी भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यामुळे वायव्य मुंबईसाठी त्यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मुंबईतील या महत्त्वाच्या मतदारसंघासाठी कोणाची वर्णी लागेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारून घराघराच पोहोचलेले अभिनेत अरुण गोविल यांना भाजपकडून लोकसभेचं तिकिट मिळालं आहे. हिमाचलप्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून कंगना तर उत्तरप्रदेशमधील मेरठ या मतदारसंघातून अरुण गोविल निवडणूक लढवणार आहेत.