‘ओ सनम’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘कितनी हसीन जिंदगी’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांचे गायक लकी अली यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. सध्याच्या काळाज मुस्लीम असल्याबद्दल काय वाटतं, याविषयी त्यांनी ही पोस्ट एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली आहे. सध्याच्या घडीला मुस्लीम असणं हे एकाकी वाटतं आणि जगाकडून ‘दहशतवादी’ असा लेबल लावला जातो, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. लकी अली नव्वदच्या दशकातील अत्यंत लोकप्रिय गायक आहेत. त्यांच्या गाण्यांनी आजच्या तरुणाईच्या मनातही भुरळ घातली आहे. लकी अली यांनी शुक्रवारी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आणि या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘आज जगात मुस्लिम असणं ही एकाकीपणाची भावना मनात आणते. पैगंबरांच्या सुन्नाचं पालन करणं म्हणजे एकाकीपणाची गोष्ट बनली आहे. तुमचे मित्र तुम्हाला सोडून जातील, जग तुम्हाला दहशतवादी म्हणेल’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे. लकी अली यांनी अचानक अशी पोस्ट का लिहिली, याविषयी काही स्पष्टता नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Its a lonely thing to be a Muslim in the World today
its a lonely thingto follow the sunnah of the Prophet , your friends will leave you , the world will call you a terrorist……..— Lucky Ali (@luckyali) July 12, 2024
‘उस्तादजी या जगात चांगली आणि वाईट लोकं आहेत. माझ्यासारखी कोणतीच विशेष ओळख नसलेली व्यक्ती तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही महान आहात आणि नेहमीच राहाल. जो माणूस चांगला असतो तो चांगला माणूस म्हणूनच ओळखला जाईल. मग त्याचं नाव लकी अली असो किंवा लकी शर्मा’, असं एकाने लिहिलं. तर ‘जर तुमचे मित्र तुम्हाला या कारणासाठी सोडून जात असतील तर ते तुमचे मित्रच नव्हते’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘चुकीच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. भौतिकवादी लोकांसोबत राहिल्यावर शांती आणि अध्यात्म मिळणं कठीण होतं’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
लकी अली हे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते मेहमूद यांचे पुत्र आहेत. मेहमूद हे 60-70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते होते. ते बेंगळुरूमध्ये राहतात. वडिलांच्या निधनानंतर ते मुंबई सोडून गेले. नव्वदच्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला त्यांची गाणी खूप गाजली होती.