अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी 23 जून रोजी लग्न केलं. या लग्नाला तिचा सख्खा भाऊ लव सिन्हा उपस्थित नव्हता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता खुद्द लवने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित लग्नाला उपस्थित न राहण्यामागचं कारण सांगितलं आहे. “काहीही झालं तरी काही लोकांशी कधीच संबंध ठेवायचा नव्हता, म्हणून मी लग्नाला गेलो नव्हतो”, असं त्याने लिहिलंय. यामुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. मुलाच्या वडिलांचाही उल्लेख करत त्याने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे सिन्हा कुटुंबीयांमध्ये सोनाक्षीच्या सासरच्यांविषयी हमखास नाराजी असल्याचं स्पष्ट होतंय.
सोनाक्षी आणि झहीरने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर 23 जून रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर त्यांनी भव्य रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा तर दिसले. मात्र सोनाक्षीचे सख्खे भाऊ लव आणि कुश कुठेच दिसले नव्हते. कुशने नंतर स्पष्ट केलं की तो बहिणीच्या लग्नाला उपस्थित होता. तर लवने बहिणीच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला होता. आता लग्नाच्या काही दिवसांनंतर लवने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिले आहेत.
30 जून रोजी पहिल्या पोस्टमध्ये लवने म्हटलं होतं, ‘मी लग्नसोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय का घेतला? माझ्या विरोधात खोट्या आधारांवर ऑनलाइन मोहीम चालवल्याने हे तथ्य बदलणार नाही की माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वांत आधी येतं.’ मात्र यानंतर त्याने याच्या पूर्णपणे उलट एक ट्विट केलं. हे ट्विट वाचून नेटकऱ्यांना खात्री पटली आहे की, सिन्हा कुटुंबीयांमध्ये काहीतरी गडबड आहे.
‘त्याच्या कौटुंबिक व्यवसायाबद्दल काळजीपूर्वक बातम्या तयार केल्या गेल्या आहेत. मुलाच्या वडिलांचं एका अशा राजकारण्याशी जवळचे संबंध आहेत, ज्याची ईडी चौकशी वॉशिंग मशीनमध्ये गायब झाली होती, याकडे कोणी लक्ष वेधत नाही. तसंच मुलाच्या वडिलांच्या दुबईतील वास्तव्याबद्दलही कोणतीच चर्चा नाही’, असं वादग्रस्त ट्विट लव सिन्हाने केलंय.
यापुढे त्याने म्हटलंय, ‘मी लग्नाला उपस्थित का राहिलो नाही याची कारणं अगदी स्पष्ट आहेत आणि काहीही झालं तरी मी काही लोकांशी कधीच संबंध ठेवणार नाही. मला आनंद आहे की मीडियाच्या सदस्याने पीआर टीमद्वारे मांडलेल्या सर्जनशील कथांवर अवलंबून न राहता त्यांचा रिसर्च केला.’ लवच्या या ट्विट्समुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.