मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजचा पहिला सिझन गाजल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनची प्रचंड उत्सुकता होती. अखेर ‘मेड इन हेवन 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. या दुसऱ्या सिझनमध्येही कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना काही नवीन चेहरेसुद्धा दिसणार आहेत. त्यामध्ये मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, त्रिनेत्रा हालदार यांचा समावेश आहे. यापैकी त्रिनेत्रा ही पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहे. तिने नुकतंच अभिनयविश्वात पाऊल ठेवलं आहे. तिच्याविषयी सोशल मीडियावर कुतूहल निर्माण झालं आहे.
त्रिनेत्रा हालदार ही पेशाने डॉक्टर आहे आणि कर्नाटकमधील ती पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर आहे. यासाठी तिला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. आयुष्यातील आव्हानांना ठामपणे सामोरं जात जेव्हा त्रिनेत्रा डॉक्टर बनली, तेव्हा अनेकांसाठी ती प्रेरणास्थान झाली. त्रिनेत्राचा बेंगळुरूमध्ये जन्म झाला आणि आईवडिलांनी तिचं नाव अंगद असं ठेवलं. सुरुवातीच्या काळात ती आईची साडी नेसून मेकअप करून फिरायची. तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली. लहानपणीचं खुळ असं समजून कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर जेव्हा या गोष्टी बदलल्या नाहीत, तेव्हा बऱ्याच समस्या निर्माण झाल्या.
त्रिनेत्रा ही अभ्यासात फार हुशार होती आणि शाळेतील इतर कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये ती आवर्जून भाग घ्यायची. शालेय जीवनातही तिच्यासमोर अनेक आव्हानं होती. इतर मित्रमैत्रिणींनी तिचा स्वीकार केला नाही. मात्र आईवडिलांनी साथ दिल्याने त्रिनेत्रासाठी हा प्रवास थोडा कमी त्रासदायक ठरला. बारावीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी सुधारू लागल्या होत्या.
त्रिनेत्रा ही एक डॉक्टर आणि आता एक अभिनेत्री बनली असली तरी समाजसेवेतही तिचा पुढाकार आहे. देशात LGBTQIA द्वारा एका ग्रुपमध्ये ती सहभागी आहे. ती अनेकदा स्वास्थ्याशी संबंधित, असमानता, शारीरिक विकृती यांबद्दल अभियान चालवते.
त्रिनेत्राने याआधी नेटफ्लिक्सच्या ‘बहस प्लॅनिंग’ या सीरिजमध्ये काम केलं आहे. यावेळी तिच्यासोबत कुशा कपिला, सृष्टी दीक्षित यांसारखे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झळकले होते.