मुंबई : 14 फेब्रुवारी 2024 | भारतीय सिनेसृष्टीत एक अशी सौंदर्यवती अभिनेत्री होऊन गेली, जिच्यापुढे सर्व काही फिकं वाटायचं. ही अभिनेत्री जितकी सुंदर होती, तितकंच दमदार तिचं अभिनयकौशल्य होतं. तिच्यासारखी अभिनेत्री आजवर अस्तित्त्वात आली नाही आणि कदाचित कधी येणारही नाही. या अभिनेत्रीचं नाव आहे मधुबाला. रंजक बाब म्हणजे मधुबाला यांचा जन्म प्रेमाच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी झाला. मात्र त्यांना प्रेमाच्या वाटेत अनेकदा काट्यांचाच अधिक सामना करावा लागला होता. मधुबाला यांचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी असं होतं. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी 1960 मध्ये किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षांनंतर 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचं निधन झालं.
मधुबाला यांच्या प्रेमकहाणीत सर्वांत आधी अभिनेते प्रेमनाथ यांचं नाव येतं. मात्र या दोघांचं नातं फक्त सहा महिनेच टिकलं होतं. त्यानंतर मधुबाला यांच्या आयुष्यात आले युसूफ खान अर्थात दिलीप कुमार. ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटात सलीम बनलेले दिलीप कुमार आणि अनारकली बनलेल्या मधुबाला यांनी पडद्यावर जी जादू दाखवली, खऱ्या आयुष्यातही दोघांची जोडी अशीच होती. या दोघांनी साखरपुडा केला होता, असंही म्हटलं जातं. फक्त निकाह होणं बाकी होतं. मात्र नऊ वर्षांचं नातं अहंकारामुळे तुटलं. कारण दिलीप कुमार आणि मधुबालाचे वडील यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी तेव्हा बी. आर. चोप्रा यांचा ‘नया दौर’ हा चित्रपट साइन केला होता. ग्वालियारमध्ये या चित्रपटाचं शूटिंग 40 दिवसांपर्यंत होणार होतं. मात्र त्याचवेळी मधुबाला यांच्या वडिलांनी त्यांना ग्वालियारला पाठवण्यास नकार दिला होता. मुलीसाठी हे सुरक्षित नाही असं म्हणत त्यांनी शूटिंग मुंबईतच करण्याचा आग्रह केला. मात्र ही गोष्ट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनाही मान्य नव्हती. अखेर ‘नया दौर’ या चित्रपटातून मधुबाला यांना हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी वैजयंतीमाला यांना भूमिका देण्यात आली. मधुबाला यांचे वडील अताउल्लाह खान यांनी करार तोडल्यामुळे बी. आर. चोप्रा यांच्याविरोधात खटला दाखल केला. या कोर्टकचेरीच्या प्रकरणामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यावर परिणाम होऊ लागला होता. दिलीप कुमार हे मधुबाला यांच्याशी लग्न करण्यास तयार होते असं म्हटलं जातं. मात्र त्यासाठी मधुबाला यांना वडिलांना सोडण्याची अट त्यांनी ठेवली होती. तर दुसरीकडे दिलीप कुमार यांनी वडिलांची माफी मागावी अशी मधुबाला यांची इच्छा होती. कोर्ट केसमुळे या दोघांच्या नात्यात इतका दुरावा निर्माण झाला की कोणीच समजून घेण्यास तयार नव्हतं. अभिमान आणि अहंकाराच्या या लढाईत अखेर नऊ वर्षांचं नातं तुटलं होतं.
दिलीप कुमार यांच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर मधुबाला पूर्णपणे खचल्या होत्या. एक रिबाऊंड म्हणून त्यांच्या आयुष्यात गायक किशोर कुमार यांची एण्ट्री झाली. या दोघांनी तीन वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर 1960 मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हा मधुबाला यांचं वय फक्त 27 वर्षे होतं. लग्नानंतर दोघं लंडन गेले, जिथे डॉक्टरांनी सांगितलं की मधुबाला या फक्त दोन वर्षेच जगू शकतात. किशोर कुमार यांनी मधुबाला यांना त्यांच्या वडिलांच्या घरी सोडलं होतं. सतत बाहेर काम असल्याने आजारी पत्नीची देखभाल करू शकणार नाही, असं कारण त्यांनी दिलं होतं. अखेर मधुबाला आणि किशोर कुमार यांच्या नात्यातही दुरावा आला. अखेर आपल्या 36 व्या वाढदिवसाच्या आठ दिवसांनंतर मधुबाला यांची प्राणज्योत मालवली.
मधुबाला यांचा जन्म ‘व्हॅलेंटाइन डे’ला झाला होता, मात्र आयुष्यभर त्या एका अशा प्रेमाच्या शोधात राहिल्या, जो त्यांची प्रत्येक परिस्थितीत साथ देईल. पण ही साथ त्यांना प्रेमनाथ, दिलीप कुमार किंवा किशोर कुमार यांच्याकडूनही मिळाली नव्हती.