महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठीवरील (Zee Marathi) ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) हा कार्यक्रम १५ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) घराघरात पोहोचले. सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी ‘होम मिनिस्टर’ निवडण्यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभ्रमंती देखील केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. लवकरच या कार्यक्रमाचे एक विशेष पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाच नाव महामिनिस्टर असं आहे.
या पर्वात महामिनिस्टरच्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहे. विजेत्या वहिनींना महामिनिस्टरचा किताब आणि ११ लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी मिळेल. ११ लाखांच्या या महापैठणीसाठी चुरस रंगताना दिसेल. महामिनिस्टर हे पर्व ११ एप्रिल पासून सोमवार ते रविवार संध्याकाळी ६ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आणि महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा अत्यंत आवडता आहे. गेली १७ वर्षे हा कार्यक्रम संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठिणी देऊन सन्मान आणि कौतुक करतोय. त्यामुळे आता महामिनिस्टरचं पर्व कसं रंगेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा:
Oscar मधल्या विल स्मिथ प्रकारावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; ‘म्हणे महिला भावनांना…’
Lock Upp: “करिअरला रुळावर आणण्यासाठी मी वशीकरण केलं होतं”; अभिनेत्रीचा खुलासा