‘महाभारत’च्या टीमला 11 वर्षांनंतर एकत्र पाहून भारावले नेटकरी; इतका बदलला कलाकारांचा लूक

| Updated on: Aug 12, 2024 | 2:50 PM

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'महाभारत' या मालिकेचे कलाकार तब्बल 11 वर्षांनंतर एकत्र आले. या रियुनियनचे फोटो सोशल मीडियावर कलाकारांनी पोस्ट केले आहेत. मात्र त्यात कृष्ण आणि शकुनी मामा न दिसल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.

महाभारतच्या टीमला 11 वर्षांनंतर एकत्र पाहून भारावले नेटकरी; इतका बदलला कलाकारांचा लूक
'महाभारत'मधील कलाकार
Image Credit source: Instagram
Follow us on

सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या ‘महाभारत’ या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. या मालिकेत कलाविश्वातील नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या ‘महाभारता’तील कलाकार आज 11 वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत. नुकतीच ही संपूर्ण टीम एकत्र आली होती. मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारलेला अभिनेता शाहीर शेखने या ‘रियुनियन’चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सर्वजण एकत्र जमल्यानंतर त्यांनी मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा गाऊन दाखवलं आणि त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

‘ही कालची रात्री होती. अनेक आठवणी ताज्या झाल्या, एकमेकांना धमकावलं आणि जबडा दुखेपर्यंत पोट धरून हसलो’, असं कॅप्शन देत शाहीरने हे फोटो पोस्ट केले आहेत. ‘महाभारत’चे दिग्दर्शक मुकेश कुमार सिंह यांनी मालिकेच्या कलाकारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. शाहीर शेख, विन राणा, अहम शर्मा, पारस अरोरा, अंकित भारद्वाज, अर्पित रांका, अंकित मोहन, लावण्या भारद्वाज, सौरव गुज्जर आणि रोहित भारद्वाज असे सर्व कलाकार एकत्र आले होते. या सर्वांनी मिळून एकत्र जेवणसुद्धा केलं होतं. यावेळी मालिकेचे निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारीसुद्धा उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

शाहीर शेखसोबतच अर्पिता रांकानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ’11 वर्षांनंतर रियुनियन. सर्वांना पुन्हा भेटून खूप आनंद झाला’, असं तिने म्हटलंय. ‘महाभारत’ टीमच्या या रियुनियनच्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी ती कमेंट सेक्शनमध्ये बोलूनही दाखवली. ‘कृष्णाची भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ जैन कुठे आहे?’, असा सवाल एकाने केला. तर ‘शकुनी मामासुद्धा गायब आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. द्रौपदीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचीही अनेकांनी आठवण काढली. मात्र त्याचसोबत ‘महाभारत’ची ही मालिका खूप चांगली होती, असं कौतुकही नेटकऱ्यांनी केलंय. ‘तुम्ही सर्वांनी अधूनमधून असं एकत्र यायला हवं. ही टीम खूप छान आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

‘महाभारत’ या मालिकेनंतर शाहीर शेखच्या करिअरमध्ये सकारात्मक वळण आलं. त्याने नंतर ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘पवित्र रिश्ता 2’, ‘ये रिश्ते हैं प्यार के’, ‘वो तो है अलबेला’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय तो नेटफ्लिक्सवरील ‘दो पत्ती’ या चित्रपटातही झळकला होता. यामध्ये त्याने कृती सनॉन आणि काजोल यांच्यासोबत काम केलं. 2020 मध्ये त्याने रुचिका कपूरशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत.