मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदेंनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर नातवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहिरांच्या पत्नीची आणि प्रख्यात कवयित्री भानुमती यांची भूमिका शाहिरांची पणती आणि केदार शिंदे यांची मुलगी सना केदार शिंदेने साकारली आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी हा शाहीर साबळेंच्या भूमिकेत आहे. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडूनही या चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे.
28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या सहा दिवसांत जवळपास 3.33 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘महाराष्ट्र शाहीर’ने 30 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी या कमाईत थोडी वाढ पहायला मिळाली.
पहिल्या दिवशी- 30 लाख रुपये
दुसऱ्या दिवशी- 55 लाख रुपये
तिसऱ्या दिवशी- 60 लाख रुपये
चौथ्या दिवशी- 1.03 कोटी रुपये
पाचव्या दिवशी- 34 लाख रुपये
सहाव्या दिवशी- 31 लाख रुपये
एकूण- 3.33 कोटी रुपये
लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेलेल्या कृष्णराव अर्थात शाहीर साबळे यांनी 1942 ची चले जाव, स्वातंत्र्यानंतरचा गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र अशा चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. लोककलेच्या क्षेत्रातील मोलाच्या योगदानबद्दल या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे तर चित्रपटाचं लेखन ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचं आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “माझे आजोबा म्हणजे शाहिर साबळेंच्या आयुष्यात आणि यशात त्यांची पत्नी माझी आजी भानुमती यांचं योगदान अद्वितीय असंच होतं. शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणं म्हणजे भानुमती. नातू म्हणून मला शाहीर मोठे वाटतातच, पण एक कलाकार म्हणूनही मला त्यांचं जीवन खूपच मोठं वाटतं. शाहिरांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपले कलाकार किती मोठे होते, आपल्या मातीतून हे कलाकार कसे घडले, त्यांनी यश कसं मिळवलं, यश मिळवणं एवढं सोपं असतं का, अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं नव्या पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून मिळतील.”