कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का? विचारणाऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारचं सडेतोड उत्तर

| Updated on: Dec 27, 2024 | 11:42 AM

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतने ख्रिसमसनिमित्त परदेश दौऱ्यातील खास फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्याची हीच पोस्ट काही नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही. त्यावरून टीका करणाऱ्यांना ओंकारने सडेतोड उत्तर दिलं आहे.

कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का? विचारणाऱ्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकारचं सडेतोड उत्तर
Onkar Raut
Image Credit source: Instagram
Follow us on

जगभरात 25 डिसेंबरला ख्रिसमस अत्यंत उत्साहात साजरा केला जाततो. अनेकांकडून ख्रिसमसनिमित्त पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. अशाच एका मराठी कलाकाराने सोशल मीडियावर ख्रिसमस ट्रीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यामुळेच त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कधी आपल्या सणांचे फोटो, पोस्ट टाकलास का भावा, असा प्रश्न त्याला करण्यात आला. हा कलाकार दुसरा-तिसरा कोणी नसून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊत आहे. मात्र ओंकारनेही संबंधित ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. ओंकारचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार काही दिवसांपूर्वी परदेश दौऱ्यावर गेले होते. लंडनमधल्या मराठी प्रेक्षकांसाठी तिथे हास्यजत्रेचे काही प्रयोग आयोजित करण्यात आले होते. तिथे ख्रिसमसनिमित्त सर्वत्र सजावट केली होती. या सजावटीचे फोटो ओंकारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंवर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. ‘चार पैसे आले की मूळ विसरतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर मंदिरं, आपलं घर आठवतं आणि मज्जा करायला त्यांचे देश आठवतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अरे हा ख्रिसमसला कसा काय पोस्ट करतोय. साध्या शिवजयंचीला पोस्ट नाही याची’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

‘कधी आपल्या सणांचे फोटो पोस्ट टाकलास का भावा,’ असा सवाल करणाऱ्या युजरला ओंकारने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याने लिहिलं, ‘हो रे, मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी पोस्ट करतो तर कधी नाही. मुळात सण हा आनंद पसरवतो. त्यात हा सण आपला तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको. लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पुरणमोळी, ख्रिसमसला सांताक्लॉजकडून येणाऱ्या गिफ्ट्सची वाट बघितली आहे, ईदला माहिमला जाऊन मालपोवा खाल्ला आहे, खूप प्रसन्नतेनं गुढीपाडवा साजरा केलाय आणि त्याच उत्साहास 31 डिसेंबरही साजरा करतोय. म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस, मेरी ख्रिसमस. सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो’.

हे सुद्धा वाचा

ओंकार राऊतने दिलेल्या या उत्तराचं अनेकांकडून कौतुक होत आहे. अभिनेता पृथ्वीक प्रतापने ओंकारच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. त्यावर त्याने ‘करारा जवाब’ असं लिहिलंय.