स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) मंचावर आली की हास्याचे कारंजे फुटतात. फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) यांसारख्या शोजमधून तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र आता तिने करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने हा निर्णय चाहत्यांना सांगितला आहे. ‘दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेंशन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगलं करायचं, त्या टेन्शनमधून काहीकाळ बाहेर पडतेय. (अजून दोन तीन एपिसोड दिसेन शूट झाले आहेत ते.) एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली 20/25 दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक 500 ते 1000 प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो, मला या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे,’ असं म्हणत तिने हास्यजत्रेचा प्रवास थांबवला आहे. (Marathi Actress)
‘एक निर्णय- नमस्कार मंडळी. अनेक वर्ष स्किट फॉरमॅटमध्ये काम करतेय. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा. 2011 पहिलं पर्व विजेता जोडी, मांगले मी.. आणि आज 2022 समीर विशाखा. मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाहीय. मी काही फार ग्रेट विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिकपणे केलं. माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील याचा विचार करीत, त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्युनिंग, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं. दर आठवड्याला मिळणाऱ्या स्किटमधील हर भूमिकेची 15 मिनिटं गेली 10 वर्ष मी जगले. माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले. Wet-cloud productions च्या पहिल्या पहिल्या थेंबापासून ते आता याक्षणी डोळ्यात साठणाऱ्या थेंबपर्यंत मी जोडले गेले. सातत्याने त्यांच्यासोबत काम करतेय आणि या फॉरमॅटमधेही एक फेरी हिंदी कॉमेडीमध्येही मारून आले. दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेंशन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगलं करायचं, त्या टेन्शनमधून काहीकाळ बाहेर पडतेय. (अजून दोन तीन एपिसोड दिसेन शूट झाले आहेत ते.) एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली 20/25 दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक 500 ते 1000 प्रयोगाची, किंवा मग सिरीयल मधली असो, मला या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे. इथलाही प्रवास खडतरच असतो, सोपा नाहीच तो. पण ना, इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो, त्या भूमिकेबरोबर तिला न्याहाळात, तिला जपत, तिला अंजारात गोंजारात, तिला वेळ देऊन, तिच्यासोबत खेळता येतं. शांत चित्ताने दिग्दर्शकाचा “ओके” हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येत. आता हे असं” काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे. रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत. त्याबद्दल खरंच मनापासून आभार,’
‘हास्य जत्रेने मला खूप काही दिलंय आणि तुम्ही जत्रेवर नितांत प्रेम केलेत. जत्रेतल्या माझ्यावर भरभरून पत्र/ लेख लिहिलीत, कविता केल्यात. माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केलात, त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवंत समजते. तुम्ही जसं हास्यजत्रेवर प्रेम केलंत तसंच मी ही खूप प्रेम केलं, करतेय आणि करेन. जीव ओतून काम केल. प्रत्येक स्किटनंतर गोस्वामी काय म्हणतील यासाठी कानाचे द्रोण ही केले. त्यात कधी यश आलं आणि कधी नाही. प्रयत्न करत राहिले पण आता थोडी धावपळ होतेय. मला खरंच अभिमान आहे की मी या जत्रेचा भाग झाले आणि हा भाव मनात आयुष्यभर राहील. जत्रेतील माझा सोबती सम्या याचे मनापासून आभार आणि त्याला खूप प्रेम. त्याने माझी अनेक रूपं लिहिली. आम्ही एकमेकांना पूरक साथ देत गेलो. रुसवे फुगवे नसतील तर काय गंमत येणार? नाही का? तर ते ही झालेच. पण जेव्हा मंचावर असायचो तेव्हा “दोन शरीर एक मन” झालेलो असायचो. त्याच्या बरोबरचा हा प्रवास कायम स्मरणात राहील असाच आहे. खूपदा त्या वेड्याकडे पाहून फुटले आहे मी ठार. वेड्याबरोबर परफॉर्म करणं अवघड असत. पण धमाल आली. सम्या always love u for your madness. अनेक सवंगडी दिले, लहान भावंडं दिली, जिवाभावाची माणसं दिली, हा प्रवास केवळ सुखाचा झाला आणि तो असाच लक्षात राहावा म्हणून देखील थांबतेय.’
‘भाकरी सतत पालटत राहावी नाहीतर ती करपते आणि नीट तयार झाली की टोपलीत टाकावी (इति गुरुजी). आंबे तयार की उतरवावे, नाहीतर ते डागळतात. थोडी चव कमीजास्त होते. म्हणून थांबतेय काही काळ. थोडं कंटाळा पण आलाय त्याच त्याच कामाचा. खूप वर्ष एकच पीक शेतकरी देखील काढत नाही. मधेच काहीतरी वेगळं बी रोवतोच कीं. तसं काहीसं वाटतंय आणि एक, मला दुसरं मोठ्ठं काम आलंय, मला सिरीयल फिल्म मिळालीय. हे अजून तरी काही घडलं नाहीय. (पण पुढे नक्कीच घडेल ) म्हणून मी जत्रा सोडतेय तर असं काहीही नाही. किंवा नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाही असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या आणि आपली एग्झिट पण ध्यानात असायलाच हवी. “जा आत्ता” असं म्हणण्यापेक्षा “अर्रर्रर्रर्र” हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां! तर मंडळी थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीच काम करायचं आहे. मंडळी कायम लोभ असावा. आता तूर्तास जत्रेतून राम राम पण नक्कीच दुसऱ्या भूमिकेतून दिसेनच. तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद असू द्यावे. माझ्यातल्या अभिनेत्रीच्या आणि नाटक निर्मातीच्या असंच पाठीशी रहा,’ असं म्हणत तिने टीममधील सर्वांचे आभार मानले.
विशाखाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हे एप्रिल फूल तर नाही ना’, असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
हेही वाचा:
Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता Bruce Willis गंभीर आजाराने ग्रस्त; फिल्म इंडस्ट्रीला केला रामराम