हैदराबाद- प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील आणि दिग्गज अभिनेते कृष्णा यांना हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. 13 नोव्हेंबर रोजी यांना हैदराबादमधील काँटिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. कृष्णा यांना नेमकं कशामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, हे अद्याप स्पष्ट नाही.
कृष्णा यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी एकीकडे चर्चा आहे. तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असंही म्हटलं जात आहे. मात्र कृष्णा यांचे जनसंपर्क अधिकारी सुरेश कोंडी यांनी ट्विट करत चाहत्यांना काळजी करू नका, असं आवाहन केलंय.
काही दिवसांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचं निधन झालं होतं. इंदिरा देवी या कृष्णा यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा यांची दुसरी पत्नी विजया निर्मला यांनी 2019 मध्ये जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून कृष्णा हे इंडस्ट्रीपासून दूर आहेत. कोणत्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांनी आपले प्राण गमावले. दीर्घ आजारानंतर 8 जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं.
कृष्णा हे 79 वर्षांचे आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ते यशस्वी हिरो, निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.