हैदराबाद: साऊथ सुपरस्टार महेश बाबू फक्त त्याच्या अभिनयकौशल्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. आता 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नम्रताने लग्नानंतर अभिनयातील करिअर सोडण्यामागचं कारण सांगितलं.
“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.
याविषयी बोलताना नम्रता पुढे म्हणाली, “लग्नानंतर आधी आपण अपार्टमेंटमध्ये राहायचं, अशी अट मी घातली होती. कारण मी मुंबईची होते आणि मला मोठमोठ्या बंगल्यांची भीती वाटायची. त्यामुळे सुरुवातीला आम्ही दोघं अपार्टमेंटमध्ये राहू लागलो होतो. जर मी हैदराबादला येत असेन तर आधी आपण अपार्टमेंटमध्ये राहू, अशी माझी अट होती. त्याचप्रमाणे त्यानेही स्पष्ट केलं होतं की लग्नानंतर मी काम करू नये.”
नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.
नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळ्याकडे लक्ष केंद्रीत केलं.