ज्याचं काही घेणंदेणंच नाही तो..; महेश मांजरेकरांनी सांगितलं ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सोडण्यामागचं कारण

| Updated on: Apr 17, 2024 | 10:30 AM

अभिनेता रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटावरून रणदीप आणि महेश मांजरेकर यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्याबद्दल आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर व्यक्त झाले आहेत.

ज्याचं काही घेणंदेणंच नाही तो..; महेश मांजरेकरांनी सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकर सोडण्यामागचं कारण
Randeep Hooda and Mahesh Manjrekar
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र सुरुवातीला महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. मे 2021 मध्ये या प्रोजेक्टची घोषणा करताना महेश मांजरेकरांचा उल्लेख चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून करण्यात आला होता. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी या बायोपिकमधून काढता पाय घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी चित्रपट सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. “मी प्रोजेक्ट मध्येच सोडल्यानंतर वीर सावरकरांचे विचार मला पटत नाहीत, अशी टीका झाली होती. मी तेव्हा काहीच बोललो नव्हतो. पण आता चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर मी स्पष्ट बोलतो. मला सावरकर यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. ज्यांनी हा चित्रपट केला, त्यांना काही घेणंदेणंही नव्हतं”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

“त्याला सावरकर काळे की गोरे हेसुद्धा माहीत नव्हतं”

“वीर सावरकरांवरील बायोपिक हा माझा प्रोजेक्ट होता. त्यासाठी निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंह यांना मी निवडलं होतं. त्यानंतर मुख्य भूमिकेसाठी रणदीपची निवड झाली. त्याला सावरकर काळे की गोरे हेसुद्धा माहीत नव्हतं. फक्त त्याचं श्रेय इतकंच होतं की त्याने सगळा इतिहास वाचून काढला होता. त्याला आधी वाटलं होतं की वीर सावरकर व्हिलन आहेत. मी त्याला सगळं नीट वाचायला सांगितलं होतं. चित्रपटाचं 70 टक्के स्क्रिप्ट माझं आहे. स्क्रिप्टच्या वेळीही त्याने अनेक बदल सुचवले होते. पण त्यामुळे शूटिंग लांबलं होतं आणि बजेट वाढू लागलं होतं. चित्रपटात मला कोणाचाही हस्तक्षेप नको होता. कारण त्याचं यश किंवा अपयश यासाठी मी जबाबदारी घ्यायला पूर्णपणे तयार होतो. मला कोणालाही दोष द्यायचा नव्हता”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

का सोडला चित्रपट?

याविषयी ते पुढे म्हणाले, “रणदीपला चित्रपटात हिटलर, इंग्लंडचा राजा, इंग्लंडचे पंतप्रधान हे सर्व पाहिजे होतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा लोकमान्य टिळकांचा भागही त्याला हवा होता. हे सर्व सावरकरांच्या बायोपिकशी कसं संबंधित आहे, हेच मला कळत नव्हतं. रणदीपला काही चुकीचे भागसुद्धा चित्रपटात समाविष्ट करायचे होते. भगत सिंग आणि सावरकर यांच्यातील एक दृश्य त्याला दाखवायचं होतं. मी जेव्हा कधी त्याला भेटायला जायचो, तेव्हा तो सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा. मग मी त्याच्याशी संवाद तरी कसा साधू? शूटिंगमध्येही तो सतत हस्तक्षेप करायचा. आता चित्रपट कसा बनवायचा, हेसुद्धा तो मला शिकवणार का? मी माझ्या पद्धतीने दिग्दर्शन करणार हे स्पष्ट केलं होतं. अखेर मी वैतागून निर्मात्यांना म्हटलं की एकतर त्याला निवडा किंवा मला. ती माझी कथा होती आणि मला माझ्या पद्धतीनुसार चित्रपट बनवायचा होता. म्हणूनच मी निर्मात्यांना प्रोजेक्टमध्ये आणलं होतं. मी रणदीपच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न उपस्थित करत नाहीये. पण प्रामाणिकपणा आणि वेडेपणा यात फरक असतो.”

हे सुद्धा वाचा

रणदीप हुडाच्या या चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.