सेलिब्रिटी हे ट्रोलर्ससाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. स्वत:चं ठोस अस्तित्व किंवा ओळख नसलेले हे ट्रोलर्स अनेकदा या सेलिब्रिटींना क्षुल्लक कारणावरून तर कधी कारण नसतानाही ट्रोल करताना दिसतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नीसोबतही सध्या असंच काही घडतंय. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यावरून त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड ट्रोल केलं जातंय. यावर व्हिडीओच्या माध्यमातून चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा मोकळेपणे व्यक्त झाले. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अशा पद्धतीच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. “माझी आई, माझे वडील, माझी मुलगी, माझी पत्नी यांना बोलायचा हक्क कोणालाच नाही. त्यांच्यावर टीका केली तर चवताळलेल्या माणसासारखा मी शोधून कानफटवेन”, अशा शब्दांत त्यांनी थेट इशारा दिला.
ट्रोलिंगविषयी महेश मांजरेकर म्हणाले, “मला त्याचा भयंकर राग येतो आणि तो यायलाच हवा. अनेकजण म्हणतात की त्याकडे दुर्लक्ष करा. पण इतरांना ट्रोल करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? मी चित्रपट बनवतो. तो बघण्यासाठी तुम्ही तुमचा पैसा खर्च केला असेल तर त्यावरून बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे. तुम्हाला चित्रपट आवडला की नाही ते सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्यावर माझी काहीही म्हणणं नाही. कारण मी प्रेक्षकांच्या आवड-नावडीचा आदर करतो. पण मी एखादी पोस्ट लिहिली की त्यावरून माझी आई, माझे वडील, माझी मुलगी, माझी पत्नी यांना बोलायचा हक्क कोणालाही नाही. तसं झाल्यास मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन.”
ट्रोलिंगविरोधात कायदा असावा, अशीदेखील त्यांनी मागणी केली आहे. “एकदा माझ्या मुलीबद्दल इतकं भीषण काहीतरी लिहिलं होतं. त्याला मी शोधून काढलं आणि तक्रार दाखल केली. अशा लोकांना आपण का माफ करावं? या सगळ्यांविरोधात जेव्हा एखादा कायदा तयार होईल, तेव्हा अशा पद्धतीचे आक्षेपार्ह कमेंट्स बंद होतील”, असं ते पुढे म्हणाले.