मुंबई : अभिनेत्री महिमा चौधरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमाच्या आईने या जगाचा निरोप घेतला आहे. तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आईच्या निधनानंतर महिमा पूर्णपणे खचली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून महिमा तिच्या वैयक्तिक आयुष्यात विविध समस्यांचा सामना करतेय. कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. आता अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
महिमा तिच्या खासगी आयुष्याबाबत फारशी व्यक्त होत नाही. म्हणूनच आईच्या निधनाविषयी ती माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर व्यक्त झाली नाही. ती तिच्या कुटुंबीयांसोबत या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. महिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा आई-वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते.
महिमा ज्यावेळी कॅन्सरचा सामना करत होती, त्यावेळीही ती माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी तिच्या कर्करोगाविषयी खुलासा केला होता. ‘महिमा चौधरीच्या धैर्याची ही कथा आहे. जवळपास एक महिन्यापूर्वी अमेरिकेतून मी महिमाला फोन केला होता. माझ्या ‘द सिग्नेचर’ या 525व्या चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल मला तिच्याशी बोलायचं होतं. तिच्याशी बोलल्यानंतर मला समजलं की तिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. महिमा ज्याप्रकारे कर्करोगाचा सामना करतेय, ते जगातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. कर्करोगाबद्दल सर्वांना सांगताना मी तिच्यासोबत राहावं अशी तिची इच्छा होती. पण महिमा.. तू खरंच हिरो आहेस. मित्रांनो, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद तिला द्या. ती सेटवर परतली आहे आणि आता पुन्हा काम करण्यास सज्ज झाली आहे’, अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली होती.
महिमाने 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट त्यावेळी तुफान गाजला होता. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.