‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान गेल्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत आहे. सोशल मीडियाद्वारे ती सतत तिच्या उपचारांविषयी, आरोग्याविषयी चाहत्यांसोबत मोकळेपणे व्यक्त होत आहे. अशातच कॅन्सरचा यशस्वीरित्या सामना केलेली अभिनेत्री महिमा चौधरीने तिची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो पोस्ट करत हिनाने इन्स्टाग्रामवर तिच्या भावना आणि महिमाने दिलेल्या पाठिंब्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कॅन्सरचं निदान होताच साथ द्यायला पोहोचलेली सर्वांत पहिली व्यक्ती ही महिमाच होती, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. हिनाच्या पहिल्या केमोथेरपीच्या वेळी महिमाने तिला सरप्राइज भेट दिली होती. यावेळी महिमाने हिनाला उपचाराविषयी मोलाचा सल्लादेखील दिला होता.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत हिनासोबतच्या या भेटीविषयी महिमा मोकळेपणे व्यक्त केली. ती म्हणाली, “एका पार्टीदरम्यान माझी हिनाशी भेट झाली होती. तेव्हापासून आम्ही एकमेकींच्या संपर्कात आहोत. पण कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिने सर्वांत आधी मलाच फोन केला होता. तिने मला म्हटलं होतं की ती अमेरिकेला उपचारासाठी जातेय आणि तिथे काय कसं करणार याविषयीची माहिती दिली होती. त्यावेळी हिनाने सर्व बुकिंगसुद्धा केली होती. तेव्हा मी तिला म्हटलं होतं की, जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं होतं, तेव्हा माझ्याही मनात हेच विचार आले होते. पण अमेरिकेत तुम्हाला स्वत:ला सर्वकाही सहन करावं लागतं आणि कॅन्सरवरील उपचार खूप कठीण असतात.”
“जेव्हा उपचाराला सुरुवात होते, तेव्हा खूप त्रास होतो. मी तिला मुंबईतच उपचार घेण्याचा सल्ला दिला. कारण तुम्ही इथे जी औषधं खाता, तिच तुम्हाला अमेरिकेत दिली जातात. तिथले डॉक्टर्ससुद्धा भारतीय असतात. किंबहुना जेव्हा तुम्ही काही अमेरिकन डॉक्टरांना उपचार करताना पाहाल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला भारतीय डॉक्टर उपचारासाठी भेटू शकणार नाही का? तुम्हाला विश्वासार्हता जाणवणार नाही. पण इथे तुम्हाला तो विश्वास जाणवेल. कोविडदरम्यान जेव्हा अमेरिकेत लोकं पॅरासेटामोल घेत होते, तेव्हा आपणही इथे तीच गोळी घेत होतो. जगभरात जर उपचारपद्धती सारखीच असेल, तर मग मायदेशीच उपचार का घेऊ नयेत? याबद्दल हिनानेही माझे आभार मानले आहेत. जेव्हा तुम्ही तुमचं दु:ख वाटून घेता, तेव्हा तुम्ही मैत्री एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते”, असं तिने पुढे सांगितलं.
या मुलाखतीत महिमासोबत अभिनेते अनुपम खेरसुद्धा होते. अनुपम खेर यांच्या पत्नीलाही कॅन्सरचं निदान झालं होतं. किरण खेरच्या उपचाराबद्दल बोलताना ते म्हणाले, “जेव्हा किरणला कॅन्सरचं निदान झालं, तेव्हा तिचेही उपचार आम्ही मुंबईतच केले. दुसरीकडे ऋषी कपूर अमेरिकेत जवळपास वर्षभर होते. तिथे तुमचं स्वत:चं घर नसतं, तुमच्या आसपास तुमची माणसं नसतात. किमान इथे तुम्हाला घरी असल्यासारखं तरी वाटतं. अनिल अंबानी यांनी किरणसाठी एअरक्राफ्ट पाठवलं होतं. एअरक्राफ्टने तिला कोकिलाबेन रुग्णालयात आणलं गेलं होतं.”