‘असा चित्रपट पहायलाच हवा’; अजय देवगणच्या ‘मैदान’चं तोंडभरून कौतुक

| Updated on: Apr 12, 2024 | 3:43 PM

भारतीय फुटबॉलचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे सैय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर आधारित 'मैदान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली आहे.

असा चित्रपट पहायलाच हवा; अजय देवगणच्या मैदानचं तोंडभरून कौतुक
Maidaan movie
Image Credit source: Instagram
Follow us on

देशभरात अभिनेता अजय देवगणचा इतका मोठा चाहतावर्ग असण्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या पडद्यावर भूमिका जिवंत करण्याचं त्याचं कौशल्य. ‘मैदान’ या चित्रपटाच्या बाबतीतही अजयने तेच केलंय. सैय्यद अब्दुल रहिम या अग्रगण्य परीक्षकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. सैय्यद अब्दुल रहिम हे भारतीय फुटबॉलचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात. अजय देवगणचा ‘मैदान’ हा स्पोर्ट्स ड्रामा 11 एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. ‘मैदान’ पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर त्याचं कौतुक करणारे असंख्य पोस्ट लिहिले आहेत. त्यावरून अजय देवगणचा हा चित्रपट कसा आहे, हे सहज लक्षात येतंय.

चित्रपटाची कथा, बॅकग्राऊंड म्युझिक आणि अजयचा दमदार अभिनय या सर्वांचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारणारे अभिनेते गजराज राव यांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख नेटकऱ्यांकडून होत आहे. ‘मैदान हा चित्रपट पहायलाच हवा. टीम इंडिया आणि सैय्यद अब्दुल रहिम सर यांना सलाम. थिएटरमध्ये सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करत होते’, असं एकाने लिहिलं. तर ‘मैदान हा अनेक पुरस्कारांसाठी पात्र आहे. अजय देवगणला या चित्रपटासाठी पुरस्कार मिळायलाच हवा’, असं दुसऱ्याने म्हटलंय. या चित्रपटाच्या माध्यमातून अजयने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

हे सुद्धा वाचा

अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि गजराज राव यांच्यासोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तिने चित्रपटात अजयच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर सकारात्मक पोस्ट लिहिले जात असतानाच ‘मैदान’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकली, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. अजय देवगणच्या ‘मैदान’सोबतच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला आहे.

आपल्या देशात क्रिकेट या खेळाची खूप क्रेझ पहायला मिळते. पण स्वातंत्र्यानंतर भारतात हॉकी आणि फुटबॉल या खेळांबद्दल लोकांमध्ये खूप रस निर्माण झाला. एकीकडे हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद होते. तर दुसरीकडे सैय्यद अब्दुल रहीम यांची जादू फुटबॉलमध्ये पहायला मिळत होती. 1951 ते 1963 पर्यंत म्हणजेच शेवटच्या श्वासापर्यंत ते भारतीय फुटबॉलच्या सेवेत होते. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय फुटबॉल संघाने अनेक आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले.