मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत मोठा लीप येणार असून प्रेक्षकांना नात्यांचे बदलते रंग पहायला मिळणार आहेत. कारण या मालिकेचं कथानक आता तब्बल 14 वर्षांनी पुढे सरकणार आहे. कार्तिकला साक्षीच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार ठरवलं गेलंय आणि त्याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. दीपासुद्धा न्यायालयाच्या निर्णयासमोर हतबल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर झाले होते आणि त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघं एकमेकांपासून दुरावले आहेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानक 14 वर्षांनी पुढे सरकणार आहे.
रंग माझा वेगळा या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र त्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘दीपा आणि कार्तिक अमर रहे. मुली 21 वर्षांच्या झाल्या तरी दीपा एकदम फिट, अजब गजब आहे सगळं,’ असं एकाने म्हटलं आहे. तर ‘इतका वनवास फक्त दीपा लाच का? काही आनंद आहे का नाही तिच्या आयुष्यात,’ असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. ‘सर्वांत नकारात्मक मालिका आहे ही, पण नकारात्मक प्रसिद्धीसुद्धा प्रसिद्धीच असते’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. आता तरी प्रेक्षकांचा वनवास संपवा, अशीही विनंती काहींनी केली आहे.
मालिकेचं कथानक आता 14 वर्षांनी पुढे सरकणार आहे आणि या 14 वर्षांत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. 14 वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र आता दीपाचा वनवास सुरु होणार आहे. यामागे नेमकं काय कारण असेल, कार्तिकने दीपाला माफ केलं का, या दोघांच्या नात्याचं भवितव्य काय असेल, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागांमधून मिळेल. रंग माझा वेगळा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
या मालिकेत रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय हर्षदा खानविलकर, विदिशा म्हस्कर, अनघा भगारे यांच्याही भूमिका आहेत.