ती परत येतेय.. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये मोठा ट्विस्ट

| Updated on: Jan 03, 2024 | 9:05 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकलं आहे. गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळत आहे. मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे.

ती परत येतेय.. सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये मोठा ट्विस्ट
Sukh Mhanje Nakki Kay Asta
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 3 जानेवारी 2024 | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नव्या कथानकासोबत अनेक नवी पात्रंही भेटीला आली आहेत. मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पहायचं होतं, त्या शालिनी शिर्के पाटीलची लवकरच मालिकेत एण्ट्री होणार आहे. जयदीप-गौरीसोबत शिर्केपाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास 25 वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परत येणार आहे.

इतक्या वर्षांच्या काळात शालिनी कुठे होती? काय करत होती? याची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडतीलच. मात्र शालिनीच्या पुन्हा येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार हे मात्र नक्की. शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा येतेय. 25 वर्षे अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहेत. इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं आहे. मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज पहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

“एकाच पात्रामध्ये दोन वेगळे लूक मला साकारायला मिळत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत परत कधी येणार याची विचारणा होत होती. मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की शालिनी पुन्हा येतेय,” अशा शब्दात माधवीने भावना व्यक्त केली. 25 वर्षांनंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुडाची आग धगधगतेय हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.