मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांत या मालिकेतील कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. तर या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी निर्माते असित मोदी यांच्याविरोधातील खटला जिंकत 1 कोटी रुपये मिळवले आहेत. आता या मालिकेसंदर्भातील आणखी एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे. मालिकेच्या शूटिंगदरम्यान मोठा वाद झाला आणि या वादादरम्यान ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्यासोबत गैरवर्तणूक करण्यात आल्याचं कळतंय.
‘तारक मेहता..’ या मालिकेत ‘बावरी’ची भूमिका साकारलेली अभिनेत्री मोनिका भदौरियाने याआधीही निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आणखी एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. तिने सांगितलं की मालिकेचे मुख्य अभिनेते दिलीप जोशी यांना चुकीची वागणूक देण्यात आली होती. त्यांच्यावर खुर्ची फेकून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मोनिकाने सांगितलं की एकेदिवशी मालिकेच्या सेटवर मोठा वाद झाला होता. मात्र त्यादिवशी ती सेटवर हजर नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सेटवर पोहोचली तेव्हा तिला समजलं की मालिकेचे ऑपरेशन हेड सोहैल रमाणी यांनी दिग्गज अभिनेत्याला चुकीची वागणूक दिली. हा दिग्गज अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे दिलीप जोशीच होते. मोनिकाने पुढे सांगितलं की खुर्ची फेकून दिलीप यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर सोहैल यांना मालिकेतून काढण्याऐवजी त्यांना फक्त दोन वर्षांसाठी बॅन करण्यात आलं होतं.
या घटनेनंतर दिलीप जोशी यांनी सोहैल यांच्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं. “जेठालालच्या नावावर ही मालिका चालते. मात्र निर्मात्यांनी नेहमीच कलाकारांना वाईट वागणूक दिली. त्यांची गुंडगिरी इतकी वाढली होती की सेटवर काम करणं कठीण झालं होतं. माझा हा दावा सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्ससुद्धा आहेत”, असाही खुलासा मोनिकाने केला.