निवडणुकीआधी ‘नाटक’वॉर; रंगभूमीवर ‘मला काही सांगायचंय’ विरुद्ध ’50 खोके एकदम ओके’

| Updated on: Sep 19, 2024 | 10:43 AM

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अंक आता रंगभूमीवर पहायला मिळणार आहे. 'मला काही सांगायचंय- एकनाथ संभाजी शिंदे' आणि '50 खोके एकदम ओके' या दोन्ही नाटकांची सध्या जोरदार चर्चा आहे. या दोन्ही नाटकात नेमकं काय पहायला मिळणार, याबद्दलची उत्सुकता रसिकांमध्ये निर्माण झाली आहे.

निवडणुकीआधी नाटकवॉर; रंगभूमीवर मला काही सांगायचंय विरुद्ध 50 खोके एकदम ओके
मराठी नाटकांचे पोस्टर
Image Credit source: Instagram
Follow us on

महाराष्ट्राचं राजकारण आता रंगभूमीवरही रंगणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. हे एकपात्री नाटक असून या नाटकाद्वारे एकनाथ शिंदे यांच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव पहायला मिळणार आहे. या नाटकाद्वारे एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ हे नाटक डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलं असून ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते अशोक समेळ, त्यांचे चिरंजीव अभिनेता संग्राम समेळ हा दीर्घांक सादर करणार आहेत. या नाटकाची येत्या दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे. या नाटकाचे अधिक तपशील लवकरच अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येतील, असं समेळ यांनी स्पष्ट केलंय.

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ या नाटकाची चर्चा असतानाच दुसरीकडे ’50 खोके एकदम ओके’ हे दुसरं नाटकही रंगभूमीवर लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. ‘50 खोके एकदम ओके’ या शीर्षकावरूनच विषय स्पष्ट करणारं नवं नाटक म्हणजे लोकनाट्य असल्याची माहिती नाटकाचे सूत्रधार दीपक गोडबोले यांनी दिली. अनेक वर्षांनंतर ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाच्या तोडीचं लोकनाट्य ‘50 खोके एकदम ओके’ या नाटकाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता येईल, असा विश्वास गोडबोले यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

’50 खोके एकदम ओके’ या नाटकाच्या पोस्टरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. ‘काय ते रस्ते.. काय ते खड्डे.. तरी पण म्हणायचं.. एकदम ओके’, असं या पोस्टरवर लिहिलंय. त्याचसोबत ‘कलाकार- सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे’, असंही त्यावर म्हटलंय. त्यामुळे आता रंगभूमीवरही महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अंक दिसणार आहे.

या नाटकांपूर्वी मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेलाही फार महत्त्व आहे. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.