बॉलिवूड इंडस्ट्रीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आज (11 सप्टेंबर) सकाळी आत्महत्या केली. सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. अनिल अरोरा यांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मलायकाचा पूर्व पती अरबाज खानचे कुटुंबीय घटनास्थळी रवाना झाले आहेत. अरबाज खानसुद्धा तातडीने घटनास्थळी पोहोचला. वडिलांच्या आत्महत्येची माहिती मिळाली तेव्हा मलायका पुण्यात होती. खबर मिळताच ती तातडीने तिथून मुंबईसाठी रवाना झाली आहे.
गेल्या वर्षी आरोग्याच्या काही समस्यांमुळे अनिल अरोरा यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी मलायका आणि तिची आई जॉइल पॉलिकार्प यांना रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं होतं. त्यावेळी अनिल यांच्यावर नेमके कोणते उपचार करण्यात आले किंवा त्यांना कशासाठी दाखल करण्यात आलं होतं, याबद्दलची माहिती समोर आली नव्हती. अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील असून ते मर्चंट नेवीमध्ये काम करायचे.
मलायका 11 वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी मलायकाची बहीण अमृता अरोरा ही सहा वर्षांची होती. घटस्फोटानंतर मलायका आणि अमृता त्यांच्या आईसोबत ठाण्याहून चेंबूरला राहायला आले. घटस्फोटानंतर आईनेच या दोघींचा सांभाळ केला. एका मुलाखतीत मलायका तिच्या बालपणाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “माझं बालपण खूप छान होतं, पण ते सोपं नव्हतं. किंबहुना माझ्या भूतकाळाचं वर्णन मी ‘गोंधळ’ या शब्दाने करेन. पण कठीण काळच तुम्हाला आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे धडे शिकवतो”, असं ती म्हणाली होती. मलायका अरोराने लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज खानला घटस्फोट दिला. 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले होते. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.