जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी ब्रेकअप केला. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लोकप्रिय जोड्यांपैकी ही एक होती. अनेकदा ट्रोलिंगचा आणि टीकांचा सामना करूनही त्यांनी जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त केलं होतं. त्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपवर चाहत्यांनीही निराशा व्यक्त केली. नेहमीच सोशल मीडियावर खुलेपणाने आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्या मलायकाने अर्जुनच्या वाढदिवसनिमित्त कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. त्यावरून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर दिवाळीत ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाला. आता अर्जुनच्या या वागण्यावरच मलायकाने प्रतिक्रिया दिली आहे.
जवळपास दोन महिने याविषयी मौन बाळगल्यानंतर मलायकाने अर्जुनच्या ‘सिंगल’ असण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, “माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्यासाठी मी कधीच सार्वजनिक प्लॅटफॉर्मची निवड करणार नाही. अर्जुनने जे काही म्हटलं होतं, तो त्याचा विशेषाधिकार, त्याचे विचार आहेत. माझ्यासाठी हे वर्ष अत्यंत आव्हानात्मक होतं. मात्र मी गोष्टींमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय आणि नवीन वर्षाची सुरुवात मी आनंदाने करण्यास पूर्णपणे तयार आहे.”
राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीला अर्जुन कपूर आणि ‘सिंघम अगेन’मधील काही कलाकार उपस्थित होते. यावेळी अर्जुन मंचावर येताच उपस्थित प्रेक्षक ‘मलायका.. मलायका’ अशा घोषणा करू लागले. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, “नाही, आता मी सिंगल आहे. शांत राहा.” त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट लिहित अप्रत्यक्षपणे रिलेशनशिप स्टेटस, नातं, मर्यादा यांविषयी मत मांडलं होतं.
एका पोस्टद्वारे मलायकानेही तिचं रिलेशनशिप स्टेटस सांगितलं होतं. ‘माझं आताचं स्टेटस..’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं आणि त्याखाली तीन पर्याय होते. रिलेशनशिपमध्ये, सिंगल आणि हेहेहेहे (हसणं) असे तीन पर्याय त्याखाली देण्यात आले होते. यापैकी मलायकाने ‘हेहेहेहे’ या पर्यायावर बरोबरची खूण केली होती.
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर 2018 पासून मलायका अर्जुनला डेट करू लागली होती. या दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं होतं. वयातील अंतरावरून दोघांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र या ट्रोलिंगलाही न जुमानता त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला होता. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यानही अर्जुनने मलायकाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण परिस्थितीत तिची साथ दिली होती.