मुंबई : 1 डिसेंबर 2023 | अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीत असलेली मलायका तिच्या फिटनेसमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. मात्र सोशल मीडियावर तिचा असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलंय. कधी फिटनेस तर कधी ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असणारी मलायका सध्या मसाजच्या व्हिडीओमध्ये चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये मलायका पेन रिलीफ ट्रीटमेंट घेताना दिसत आहे. याच ट्रीटमेंटमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर झोपली आहे आणि ऑर्थो सर्जन तिच्या खांद्याजवळची हाडं मोडताना दिसत आहे. पण मलायकाने हा मसाज घेणं काही नेटकऱ्यांना पटलं नाही. ‘हे पाहून अर्जुन कपूरचा राग अनावर होईल’, असं एकाने लिहिलं. तर ‘श्रीमंत लोक पैसे देऊन हाडं मोडून घेतात आणि गरीब मेहनत करून’, असा टोला दुसऱ्या युजरने लगावला आहे. ‘हा काहीतरी नवीनच प्रकार आहे’, असंही काहींनी म्हटलंय. मलायकाला अनेकदा तिच्या चालण्यावरून ट्रोल केलं जातं. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी तिच्या चालण्याची पद्धत ठीक करण्याची हास्यास्पद विनंती डॉक्टरांकडे केली आहे.
मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला गेल्या काही वर्षांपासून डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायकाला एकत्र डिनर डेटला गेल्याचं पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अर्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांना कुठेही एकत्र पाहिलं तरी सोशल मीडियावर त्याची आवर्जून चर्चा होते.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अर्जुनने इंस्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटाच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला. मात्र त्याच्या या फोटोंवर कुठेच मलायकाची प्रतिक्रिया दिसली नव्हती. तर दुसरीकडे मलायकासुद्धा एकटीच मुंबईत आयोजित केलेल्या प्रसिद्ध ए. पी. ढील्लनच्या पार्टीला पोहोचली होती. प्रत्येक वेळी एकत्र दिसणारं हे कपल आता वेगळे का झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.