साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

| Updated on: Aug 19, 2024 | 8:25 AM

मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहनलाल यांची प्रकृती बिघडली असून त्यांना कोची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घ्यायला त्रास, स्नायूंचं दुखणं आणि ताप यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Mohanlal
Image Credit source: Instagram
Follow us on

मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना कोची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप, श्वास घेण्यात अडचण आणि स्नायूंच्या दुखण्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ‘अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. आवश्यक त्या चाचण्या झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ‘मनोरमा ऑनलाइन’ने दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्णवेळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मोहनलाल यांना श्वासोच्छवासाचा संसर्ग झाला असावा, असं म्हणत डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस पूर्णपणे आराम करण्यास सांगितलं आहे.

मोहनलाल यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयाकडून माहितीसुद्धा देण्यात आली आहे. “मी 64 वर्षीय मोहनलाल यांच्यावर उपचार केले आहेत. त्यांना उच्च ताप, श्वास घेण्यास अडचण आणि मायल्जियाचा त्रास जाणवत होता. त्यांना श्वसनाशी संबंधित व्हायरल इन्फेक्शन झाल्याचा अंदाज आहे. त्यांना औषधं देण्यात आली असून पुढील पाच दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे”, अशी माहिती डॉ. गिरीश कुमार के. पी. यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

मोहनलाल हे त्यांच्या आगामी ‘एल 2: एम्पुरान’ या चित्रपटासाठी गुजरातमध्ये शूटिंग करत होते. पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या शूटिंगनंतर ते नुकतेच कोचीला परतले होते. कोचीमध्ये परतताच त्यांची प्रकृती बिघडली. दरम्यान, मोहनलाल यांनी शनिवारी त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. ‘बारोझ’ हा त्यांचा चित्रपट आता 3 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मल्याळम चित्रपटसृष्टीत मोहनलाल यांचं वर्चस्व पहायला मिळतं. 1978 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी ‘तिरणोत्तम’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली होती. 1980 च्या मध्यापर्यंत ते मल्याळम चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून लोकप्रिय झाले. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलंय. तेलुगूमधील ‘जनता गॅरेज’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. तर 2002 मध्ये त्यांनी ‘कंपनी’ या हिंदी चित्रपटात भूमिका साकारली होती. मोहनलाल यांनी आतापर्यंत पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.