प्रसिद्ध मल्याळम अभिनेता (Malayalam actor) विजय बाबूविरोधात (Vijay Babu) एका अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत विजयने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी पीडित आहे. या देशाचा कायदा तिला संरक्षण देतोय आणि मी त्रास सहन करत असताना ती आरामात आहे. तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही”, असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला. अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी 22 एप्रिल रोजी विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
“मी मानहानीचा खटला दाखल करेन. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी शेअर करू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण मला तिच्या कुटुंबीयांचं नुकसान करायचं नाही. मी फक्त माझी पत्नी, आई, बहीण आणि मित्रांना उत्तर देण्यास बांधिल आहे. ‘विजय बाबू दोषी नाही’ अशा छोट्याशा बातमीने हे सर्व संपू नये असं मला वाटतं,” असं तो पुढे म्हणाला.
आरोपांबद्दल सविस्तर माहिती देताना विजय म्हणाला, “ती माझ्याकडे ऑडिशनसाठी आली होती आणि तिला भूमिका मिळाली. हे सर्व झाल्यानंतर आता ती कास्टिंग काउच आणि इतर गोष्टींबद्दल बोलतेय, याचा त्रास मला होत आहे. तिने मला नैराश्यात असल्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. डिसेंबर ते मार्च 2021 पर्यंतचे तिचे सर्व मेसेज माझ्याकडे आहेत. 400 हून अधिक स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत. तिचे जे काही आरोप आहेत, मग ते बलात्कार किंवा सहमतीने असो, ते सर्व माझ्याकडे रेकॉर्डवर आहे,” असं विजयने स्पष्ट केलं.
अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत आरोप केला की विजय बाबूने तिला फिल्म इंडस्ट्रीत अधिक चांगल्या संधी देण्याचं आश्वासन देऊन एर्नाकुलम इथल्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. विजय बाबूवर बलात्कार आणि गंभीर शारीरिक इजा केल्याचा आरोपही तिने केला. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप विजय बाबूची चौकशी केलेली नाही. 26 एप्रिलच्या रात्री विजय बाबूने फेसबुक लाईव्हद्वारे त्याच्यावरील आरोपांवरील भाष्य केलं आणि या प्रकरणात तोच पीडित असल्याचं म्हटलंय. या लाईव्हदरम्यान त्याने पीडितेचं नावंही सांगितलं होतं.