मुंबई : बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्री.. अनेकदा अभिनेते आणि अभिनेत्री कास्टिंग काऊचचे शिकार होतात. काही कलाकार याविषयी मोकळेपणे बोलतात. तर काही बऱ्याच वर्षांनंतर त्याविषयी व्यक्त होण्याचं धाडस करतात. नुकत्याच एका दाक्षिणात्य अभिनेत्री तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतल्या मालविका श्रीनाथने एका मुलाखतीत हा अनुभव सांगितला.
प्रसिद्ध अभिनेत्री मंजू वॉरियरच्या मुलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन देताना तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. या ऑडिशनसाठी ती तिच्या आई आणि बहिणीसोबत गेली होती. मात्र त्या दोघींना बाहेरच थांबवून मालविकाला एका रुममध्ये नेण्यात आलं होतं. त्या रुममध्ये तिला दहा मिनिटं उभं राहायला सांगण्यात आलं होतं.
‘मथुरम’, ‘सॅटर्डे नाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या मालविकासोबत जवळपास तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. “ऑडिशननंतर मला त्या व्यक्तीने सांगितलं की माझे केस खराब झाले आहेत आणि ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी ते ठीक करून यावं. त्यांनी सांगितल्यानुसार मी ड्रेसिंग रुममध्ये गेले आणि तिथे माझे केस ठीक करत असतानाच त्यांनी मला मागून पकडलं. त्या घटनेनं दचकून मी रडू लागले आणि त्याच्या कॅमेऱ्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान त्याचं लक्ष कॅमेराकडे आणि तितक्यात मी तिथून पळून आली”, असं मालविकाने सांगितलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी का रडत होती, हे माझ्या आईला आणि बहिणीला कळालं नव्हतं. मी थेट इमारतीतून बाहेर पडले आणि समोर रस्त्यावर बस उभी असल्याचं पाहिलं. त्या बसमध्ये मी चढले आणि खूप रडले. ती बस कुठे जात होती हेसुद्धा मला माहीत नव्हतं. इंडस्ट्रीत अशा प्रकारे दोन ते तीन वेळा मी कास्टिंग काऊचचा सामना केला.”
याआधी बऱ्याच कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेनंही त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला होता. मुंबईत आल्यानंतर मला समजलं की फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही भिती वाटू शकते, असं तो म्हणाला होता.