मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : ऑस्कर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी भारताकडून एका मल्याळम चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने देशाकडून अधिकृत एण्ट्री म्हणून ‘2018’ या मल्याळम चित्रपटाची निवड केली आहे. टॉविनो थॉमसने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ या तेलुगू चित्रपटाचा बोलबाला पहायला मिळाला होता. यामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
ऑस्करसाठी याआधी भारताकडून गली बॉय, लास्ट फिल्म शो, पेबल्स आणि जलीकट्टू यांसारख्या चित्रपटांना अधिकृत एण्ट्री म्हणून पाठवण्यात आलं होतं. आतापर्यंत फक्त तीन भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे. यात मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान या चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘रायटिंग विथ फायर’ आणि ‘ऑल दॅट ब्रीद्स’ या दोन भारतीय माहितीपटांनाही नामांकन मिळालं होतं. गेल्या वर्षी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा (शॉर्ट) ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
2018 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता टॉविनो याने ऑस्कर एण्ट्रीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होणं ही आमच्यासाठी खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे. अभिनेता म्हणून केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण टीमसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. 2018 या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला हे सांगू इच्छित होतो की प्रत्येक विध्वंसाच्या अखेरीस नेहमीच एक आशेचा किरण असतो.”
2018 या चित्रपटाला ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडण्याआधी ‘द केरळ स्टोरी’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’, ‘वाळवी’, ‘बलगम’, ’16 ऑगस्ट’ यांसारख्या 22 चित्रपटांबाबत विचार करण्यात आला होता. या 22 चित्रपटांपैकी ‘2018 : एव्हरीवन इज अ हिरो’ या चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटात टॉविनो थॉमससोबतच कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.